दोन वर्षांपासून नालीचे काम अपूर्ण
By admin | Published: June 15, 2014 11:32 PM2014-06-15T23:32:01+5:302014-06-15T23:32:01+5:30
सन २०११-१२ या वर्षात नवीन बसस्थानकासमोरील नालीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. कंत्राटदाराने सदर काम २०१४ मध्ये सुरू केले. केवळ २० ते २५ मीटर नालीचे बांधकाम करून कंत्राटदाराने काम बंद केले.
आरमोरी : सन २०११-१२ या वर्षात नवीन बसस्थानकासमोरील नालीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. कंत्राटदाराने सदर काम २०१४ मध्ये सुरू केले. केवळ २० ते २५ मीटर नालीचे बांधकाम करून कंत्राटदाराने काम बंद केले. अधिकारी व कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे नालीचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून अपूर्ण आहे.
या बांधकामाचे चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तंटामुक्त समितीचे सदस्य शरद भोयर यांनी केली आहे. या अर्धवट बांधकामाविषयी शरद भोयर यांनी संबंधित कंत्राटदारास विचारणा केली असता, आता पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित नाली बांधकाम पुढील वर्षी करणार असल्याचे सांगितल्याचे भोयर यांनी म्हटले आहे. या नाली बांधकामासाठी आलेला निधी अभियंता, अधिकारी व कंत्राटदाराने संगनमत करून हडप केल्याचा आरोपही शरद भोयर यांनी केला आहे. सदर नालीचे काम ताडुरवार चौक ते बर्डी टी पार्इंट पर्यंत मंजूर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला करायचे होते. मात्र कंत्राटदाराने रस्त्याच्या एकाच बाजुला केवळ २० ते २५ मीटर नाली बांधकाम केले. उर्वरित नाली बांधकामासाठी त्या ठिकाणी खड्डे खोदून ठेवले आहे. पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्यात पाणी साचून नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो, असेही भोयर यांनी म्हटले आहे. नाली बांधकाम पूर्ण करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)