वेगवेगळ्या अपघातात दोन युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 06:00 AM2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:18+5:30
भास्कर रामसू हिचामी (२०) रा. माल्लेरमाल असे मृतक युवकाचे नाव आहे. भास्कर हा पावीमुरांडा येथील त्याचा मामा शंकर पोटावी यांच्या घरी शेतीची कामे करण्यासाठी आला होता. गुरूवारी सकाळी गावाकडे जातो, असे सांगून त्याने मामाची एमएच ३३ यू ७६४५ क्रमांकाची दुचाकी घेऊन तो माल्लेरमालला गेला होता. घरचे काम आटोपल्यानंतर पुन्हा तो सायंकाळी पावीमुरांडाकडे येण्यासाठी निघाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा/तळोधी मो. : दोन वेगवेगळ्या दुचाकी अपघातांमध्ये दोन युवक गंभीर जखमी होऊन ठार झाले, तर दोघे जखमी झाले आहेत.
तळोधी मो. : नाल्याच्या पुलावरून दुचाकीसह कोसळून युवक जागीच ठार झाल्याची घटना मुरमुरी ते येडानूर दरम्यानच्या नाल्यावर गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
भास्कर रामसू हिचामी (२०) रा. माल्लेरमाल असे मृतक युवकाचे नाव आहे. भास्कर हा पावीमुरांडा येथील त्याचा मामा शंकर पोटावी यांच्या घरी शेतीची कामे करण्यासाठी आला होता. गुरूवारी सकाळी गावाकडे जातो, असे सांगून त्याने मामाची एमएच ३३ यू ७६४५ क्रमांकाची दुचाकी घेऊन तो माल्लेरमालला गेला होता. घरचे काम आटोपल्यानंतर पुन्हा तो सायंकाळी पावीमुरांडाकडे येण्यासाठी निघाला होता. दरम्यान त्याने मोठ्या प्रमाणात दारू घेतली होती. नवतळा गावाजवळ रस्त्याच्या बाजुला दुचाकी उभी करून तो झोपला होता. शुध्दीवर आल्यानंतर पुन्हा तो दुचाकीने पावीमुरांडाकडे जाण्यासाठी निघाला होता. पुलावरून जात असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे तो दुचाकीसह नाल्याच्या पाण्यात कोसळला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. सदर घटना शुक्रवारी उघडकीस आली.
मुलचेरा : दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मुलचेरापासून दोन किमी अंतरावर घडली.
सोनू रामपाल मेंझ (२०) रा. कातलामी टोला असे मृतक युवकाचे नाव आहे. या अपघातात ऋषी कालिदास येलमुले व सुरज बंडू वाकडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. तिघेजण दुचाकीने मुलचेरावरून देशबंधूग्राम या गावाकडे जात होते. दरम्यान मुलचेरापासून २ किमी अंतरावर असलेल्या वळण मार्गावर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. यात सोनूच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्याला गडचिरोली येथील रूग्णालयात नेले जात असताना वाटेतच सोनूचा मृत्यू झाला.
सोनू व इतर दोघांना ज्या १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने गडचिरोली रूग्णालयात भरती केले जात होते, त्या रूग्णवाहिकेत डॉक्टर नव्हते. केवळ चालक रूग्णवाहिका घेऊन गडचिरोली येथे नेत होता. त्यामुळे प्रवासादरम्यान त्यांना कोणताच उपचार मिळू शकला नाही.
मरण्यापूर्वी दुचाकी केली उभी?
ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी पाण्यात दुचाकी मधल्या स्टॅन्डवर उभी होती. तर दुचाकीच्या बाजुला भास्करचा मृतदेह पाण्यात पडला होता. मधल्या स्टॅन्डवर दुचाकी उभी कशी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. भास्कर हा दुचाकीसह पाण्यात कोसळल्यानंतर तो काही काळ शुध्दीवर असावा. त्यामुळे त्याने पाण्यातच दुचाकी मधल्या स्टॅन्डवर उभी केल्याचे दिसून येते. त्यानंतर कदाचित त्याचा तोल गेल्याने किंवा बेशुध्द पडल्याने तो पाण्यात पडला व पाण्यातच बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.