दुचाकींची समोरासमोर धडक दोन युवक ठार, तिघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:48 PM2019-05-13T22:48:28+5:302019-05-13T22:49:39+5:30
अहेरी-आलापल्ली मार्गावरील प्राणहिता पोलीस मुख्यालयासमोर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक बसली. या धडकेत दोन युवक जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी-आलापल्ली मार्गावरील प्राणहिता पोलीस मुख्यालयासमोर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक बसली. या धडकेत दोन युवक जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडला.
गोपाल महतो (३१) रा. अहेरी व संतोष गट्टू दुडलवार (२५) रा. जिमलगट्टा अशी मृतकांची नावे आहेत. मल्लिकार्जुन वारला (२८) रा. रेगुंठा, विष्णू अंगावार रा. व्यंकटापूर व एक युवती अशी जखमींची नावे आहेत. गोपाल महतो हा अहेरी येथील जिल्हा उपजिल्हा रूग्णालयात कंत्राटी तत्वावर कार्यरत होता. तो युवतीसोबत एटापल्लीकडे जात होता. तर संतोष, मल्लिकार्जुन व विष्णू हे तिघे मित्र भामरागडवरून परीक्षा देऊन अहेरीकडे परत येत होते. त्यांच्या भरधाव दुचाकींची समोरासमोर जबर धडक बसली. या धडकेत दुचाकी चालविणारे गोपाल व संतोष हे जागीच ठार झाले. जखमींना तत्काळ अहेरी उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. त्यातील एकाला चंद्रपूर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.