उज्ज्वला गॅस योजनेतून महिलांना मिळाला सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:24 AM2018-04-21T01:24:34+5:302018-04-21T01:24:34+5:30
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना गतवर्षीपासून अंमलात आणली. या योजनेअंतर्गत हजारो कुटुंबांना महिलांच्या नावे गॅस कनेक्शन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना गतवर्षीपासून अंमलात आणली. या योजनेअंतर्गत हजारो कुटुंबांना महिलांच्या नावे गॅस कनेक्शन देण्यात आले. यामुळे हजारो घरांचा स्वयंपाक धुरविरहीत होऊन या योजनेतून खऱ्या अर्थाने महिलांना सन्मान मिळाला, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांनी केले.
स्वस्थ आणि समृद्ध भारत निर्मितीसाठी शासनामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी व जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपने १४ एप्रिलपासून ग्राम स्वराज अभियान सुरू केले आहे. हे अभियान ५ मे पर्यंत राबविले जाणार आहे. त्याअनुषंगाने २० एप्रिल रोजी शुक्रवारला गडचिरोलीनजीकच्या कोटगल येथे उज्ज्वला पंचायतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, प्रशांत वाघरे, डॉ. भारत खटी, सरपंच भारत खोब्रागडे, उपसरपंच अमोल गद्देवार, मार्केटिंग अधिकारी विजयकुमार यादव, हेमंत मिश्रा, सुखदेव कोलते आदी उपस्थित होते.
यावेळी उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन वितरण मेळावा तसेच पात्र ग्राहकांची नोंदणी करून अभियानाची जागृती करण्यात आली. पुढे बोलताना खा. अशोक नेते म्हणाले, स्वयंपाकासाठी ओला लाकूड जाळण्यात येत असल्यामुळे नाका-तोंडाद्वारे धूर पोटात जातो. यातून अतिशय दुर्धर आजार महिलांना जडतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास महिलांसाठी उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना अंमलात आणली. सदर योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील महिलांना कनेक्शनचा लाभ देण्यात येणार आहे. एपीएल, बीपीएल कुटुंबातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खा. नेते यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला धनराज भोयर, मंगला कबेवार, अर्चना खोब्रागडे, पर्वत कोरेवार, खुशाल भोयर, ममता दुधबावरे, गौतम वेस्कडे, बाळकृष्ण खोब्रागडे आदींसह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र डोंगरे यांच्यासह पुरवठा विभागाचे कर्मचारी व एलपीजी गॅस कंपनीच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले.
१५० गॅस कनेक्शनचे वितरण
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत खा. अशोक नेते व उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात सुनीता कबेवार, संगीता लोनबले, सुशील भोयर यांच्यासह १५० महिलांना गॅस कनेक्शनचे व सिलिंडरचे वाटप करण्यात आले. सदर गॅसचा वापर योग्य व काळजीपूर्वक करावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी संबंधित लाभार्थी महिलांना यावेळी केले.