अल्टीमेटम संपला, खड्डे कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:34 AM2017-12-17T00:34:47+5:302017-12-17T00:35:17+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील २० टक्के रस्त्यांवर अजुनही खड्डे कायम असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील २० टक्के रस्त्यांवर अजुनही खड्डे कायम असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून दिसून येते.
जिल्ह्यात १०४१.२१ किमीचे राज्य मार्ग आहेत. त्यापैकी ६८२.०३ किमी मार्गावर खड्डे पडले होते. बांधकाम विभागाने ५७९.७३ किमीवरील खड्डे बुजविले आहेत. खड्डे बुजविण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ८६१.१२ किमीच्या प्रमुख जिल्हा मार्गापैकी ६७१.१२ किमी मार्गावर खड्डे पडले होते. त्यातील ४९६.६२ किमी मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे प्रमाण ७४ टक्के आहे. दोन्ही मार्गावरील खड्डे मिळून ८० टक्के खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही मार्गाचे मिळून २० टक्के काम शिल्लक आहे. एकूण २७६.३६ किमी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी राज्य शासनाने सुमारे २१ कोटी ६ लाख ६९ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ कोटी २६ लाख ७० हजार रूपये खड्डे बुजविण्यावर खर्च केले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला निधीची कमतरता पडू दिली नाही. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १५ दिवस चाललेल्या नक्षल घटना व बंदमुळे कामाला गती मिळाली नाही. परिणामी बांधकाम विभागाला दिलेल्या अल्टीमेटममध्ये काम पूर्ण होऊ शकले नाही. ही बाब मान्य असली तरी पुढील १५ दिवसात खड्डेमुक्त रस्ते तयार करण्याचे आव्हान बांधकाम विभागासमोर आहे. अधिवेशनादरम्यान बांधकाम विभागाच्या खड्ड्यांचा आढावा घेतला गेला. कामाला गती मिळण्याची आशा आहे.
नक्षल सप्ताहामुळे कामात अडचण
गडचिरोली जिल्हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. ७ ते १३ नोव्हेंबर व २ ते ८ डिसेंबर या कालावधीत नक्षल्यांनी बंदचे आवाहन केले होते. या कालावधीत नक्षल्यांकडून जाळपोळ करण्याच्या घटना घडत असल्याने कंत्राटदार या कालावधीत काम करण्यास तयार नव्हते. परिणामी १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील खड्डे बुजविण्याचे काम १०० टक्के पूर्ण होऊ शकले नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
राष्ट्रीय महामार्गावरही खड्डे
गडचिरोली जिल्ह्यातून जाणाºया प्रमुख चार मार्गांना केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे या महामार्गाच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आली आहे. मात्र याही विभागाचे मार्ग दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. नवीन मार्ग बांधण्यासाठी आणखी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत या मार्गांची डागडुजी करणे आवश्यक आहे. धानोरा ते मुरूमगाव व पुढे छत्तीसगडपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून छत्तीसगड राज्यातून अवजड वाहनांची नेहमी वर्दळ राहते. सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा-अंकिसा-आसरअल्ली या मुख्य मार्गाची सुध्दा मोठी दुरवस्था झाली आहे. या मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे.