अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:47 AM2019-03-11T00:47:06+5:302019-03-11T00:50:51+5:30
स्थानिक नगर पालिकेच्या कर विभागाच्या पथकाने शनिवारी शहरातील बसस्थानक परिसर, इंदिरा गांधी चौक व धानोरा व चामोर्शी मार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर काढण्याची कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या कर विभागाच्या पथकाने शनिवारी शहरातील बसस्थानक परिसर, इंदिरा गांधी चौक व धानोरा व चामोर्शी मार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर काढण्याची कारवाई केली. पक्षांचे अनधिकृत बॅनर, खासगी होर्डिंग्ज, पक्षांचे झेंडे, तोरण आदी मिळून एकूण ११९ साहित्य ट्रॅक्टरमध्ये टाकून नगर पालिकेत जप्त केले आहे.
गडचिरोली शहराच्या मोक्याच्या जागेवर तसेच मार्गालगत होर्डिंग्ज व बॅनर लावण्यासाठी पालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. नगर पालिकेने ठरलेल्या दराची रक्कम अदा करून होर्डिंग्ज व बॅनर लावले जातात. मात्र नगर पालिकेचे यापूर्वी दुर्लक्ष झाल्याने शहरातील इंदिरा गांधी चौक तसेच चारही मुख्य मार्गावर अनधिकृतपणे बॅनर, होर्डिंग्ज तसेच पक्षाचे तोरण व झेंडे लावल्या जात होते. अशा प्रकारच्या अनधिकृत व बॅनर होर्डिंग्जमुळे इंदिरा गांधी चौकाला विद्रुप स्वरूप येत होते. या संदर्भात माध्यमांनी अनेकदा वृत्त प्रकाशित करून नगर परिषद प्रशासनाला जागे केले होते. मात्र धडक कारवाई राबविण्यात आली नाही.
दरम्यान नगर पालिकेचे कर विभाग म्हणून नव्याने रूजू झालेल्या रवींद्र भंडारवार यांनी पुढाकार घेऊन शनिवारपासून अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर काढण्याची कारवाई हाती घेतली. शनिवारी सकाळी ९ वाजतापासून नगर पालिकेने ही कारवाई हाती घेतली. ज्यांनी अधिकृतपणे परवानगी न घेता बॅनर व होर्डिंग्ज लावले, असे सर्व होर्डिंग्ज काढून जमा करण्यात आले. या कारवाईदरम्यान कर विभागाचे कर्मचारी सुनील पुण्यप्रेडीवार व मजुरांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे, सदर कारवाईदरम्यान शहरात केवळ अधिकृतपणे लावलेले १२ होर्डिंग्ज व बॅनर आढळून आले.
असे आहेत
पालिकेचे दर
अधिकृतपणे लावावयाच्या बॅनर, पोस्टर व होर्डिंग्जसाठीचे दर पालिकेने निश्चित केले आहेत. एका वर्षासाठी मोठे बॅनर लावल्यास १० हजार रुपये आकारले जातात. मध्यम आकाराच्या बॅनरला वर्षाकाठी सात हजार रुपये आकारले जातात. चार बाय सहा आकाराच्या लहान बॅनरला वर्षाकाठी पाच हजार रुपये घेतले जातात. दिवसानुसारही पालिकेने याचे दर निश्चित केले आहेत. एका दिवसासाठी लहान बॅनरला २५ रुपये आकारले जातात. याचा आकार ५० स्केअरफुट असणे आवश्यक आहे. १०० ते १५० स्केअरफुट आकाराच्या बॅनरला प्रती दिवस ५० रुपये प्रमाणे दर आकारला जातो.
धडक कारवाई सुरूच राहणार
अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर लावण्याचे प्रमाण गडचिरोली शहरात मोठे आहे. आजपर्यंत पालिकेच्या वतीने अशा प्रकारची धडक मोहीम राबविण्यात आली नाही. त्यामुळे १०० वर अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर इंदिरा गांधी चौक, बसस्थानक व चारही मुख्य मार्गावर लावण्यात आले होते. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनंतर भंडारीवार यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन शहरात पाहणी केली. यावेळी जागोजागी अनधिकृत होर्डिंग्ज लागले असल्याचे दिसून आले. अनधिकृत होर्डिंग्ज लावण्याची कारवाई आणखी दोन ते तीन दिवस चालणार आहे, अशी माहिती कर विभाग प्रमुख तथा नोडल अधिकारी रवींद्र भंडारवार यांनी लोकमतशी बोलताना दिली.
आचारसंहितेच्या शक्यतेने कारवाई
लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसात घोषित होणार असून आचारसंहिता लागू होणार आहे. तशी तयारीही जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या नगर विकास विभागाने पालिकेला होर्डिंग्ज व बॅनर हटविण्याचे सूचित केले. त्यामुळे पालिकेच्या वतीने ही कारवाई हाती घेण्यात आल्याची माहिती आहे. सदर कारवाई नियमितपणे राबवावी, अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.