आरोग्य केंद्रात नेमले अनधिकृत कर्मचारी, रुग्णांच्या जीवाशी सर्रास खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 04:07 PM2024-10-24T16:07:47+5:302024-10-24T16:10:05+5:30
अतिदुर्गम कमलापूरमधील प्रकार : १८ वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी एकाच ठिकाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १८ वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी एकाच ठिकाणी ठाण मांडून. सोबतीला तीन कंत्राटी डॉक्टर अन् आरोग्य कर्मचारी. मात्र, कोणाचा कोणाला पायपोस नाही. डॉक्टर कधी येतात, तर कधी येत नाहीत. धक्कादायक म्हणजे येथे अनधिकृत कर्मचारी नेमण्यात आले असून रुग्णांच्या तपासणीपासून उपचारापर्यंतची सेवा तेच देतात. शिवाय काही रुग्णांना खासगी दवाखान्यातही पाठविले जाते. हा सगळा प्रकार अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे.
कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. राजेश मानकर हे वैद्यकीय अधीक्षक आहेत. ते १८ वर्षांपासून याच ठिकाणी ठाण मांडून आहेत. वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालेले डॉ. मानकर याच ठिकाणी पदोन्नतीने अधीक्षक बनले; पण त्यांची बदली झाली नाही.
मानसेवी अधिकारी डॉ. संतोष नैताम हे देखील सात ते आठ वर्षांपासून याच ठिकाणी कर्तव्य बजावतात. याच भागात त्यांचे दोन खासगी दवाखाने आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या अनेक रुग्णांना राजरोसपणे खासगी दवाखान्यांत वळविले जाते.
'लोकमत'ला पत्र पाठवून फोडली वाचा
दरम्यान, अहेरी तालुक्यातील कमलापूर हे अतिदुर्गम व नक्षलप्रभावित गाव आहे. जिल्ह्यात नक्षल्यांनी प्रवेश केल्यानंतर ४० वर्षापूर्वी पहिली सभा याच गावात घेतली होती. राज्यातील एकमेव हत्ती कॅम्पही येथेच आहे. यामुळे हे गाव चर्चेत असते. येथील एका सुजाण वाचकाने 'लोकमत'ला पत्र लिहून गावातील आरोग्य केंद्रातील मनमानी कारभाराबाबत विस्तृतपणे कळवले. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर 'लोकमत'ने र्सव बाबी पडताळल्या असता, त्यात तथ्य आढळले.
अनधिकृत परिचारिका शासकीय निवासस्थानांत
यासोबतच तीन अनधिकृत महिला येथे परिचारिका म्हणून काम पाहतात. एवढेच नाही तर त्या शासकीय वसाहतींमध्ये राहत आहेत. त्यामुळे हा सगळा गैरप्रकार इतक्या राजरोसपणे चालतो तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
"कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असा काही गैरप्रकार होत असेल तर माहिती घेण्यात येईल. लोकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशा गोष्टी अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. याबाबत चौकशी केली जाईल. त्यात नेमके काय समोर येते, यावर कारवाईची दिशा ठरविण्यात येईल."
- डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी