जिल्हा सहकारी बँकेवर पुन्हा सावकार गटाचे निर्विवाद वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:34 AM2021-02-07T04:34:48+5:302021-02-07T04:34:48+5:30
गडचिरोली : राज्याच्या सहकार क्षेत्रात नावाजलेल्या येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. सर्व २१ संचालक ...
गडचिरोली : राज्याच्या सहकार क्षेत्रात नावाजलेल्या येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. सर्व २१ संचालक बिनविरोध निवडून आल्यामुळे या बँकेवरील पोरेड्डीवार सावकार गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर खाडे यांनी सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी बँकेचा निवडणूक कार्यक्रम लावला होता. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी अधिसूचना काढली होती. त्यानुसार १४ जानेवारीला निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन दि.२० पर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात आली. बँकेच्या २१ संचालकांच्या जागांसाठी २१ जणांचेच नामांकन आले. दि.२१ ला छाननी होऊन दि.२२ जानेवारीला पात्र उमेदवारांची सूची प्रसिद्ध करण्यात आली.
५ फेब्रुवारीपर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत होती; पण जेवढ्या जागा तेवढेच नामांकन असल्यामुळे कोणीही निवडणुकीतून माघार घेतली नाही. त्यामुळे दि.६ ला सर्व संचालकांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
संचालकांमध्ये यांचा समावेश
बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये अ-गटातून झंजाळ मुरलीधर रेमाजी (ता.गडचिरोली), भोयर दुर्वेश बाबूराव (ता. आरमोरी), तितीरमारे पोपटराव मन्साराम (ता. देसाईगंज), डोंगरवार खेमनाथ सीताराम (ता. कुरखेडा-कोरची), साळवे अनंत घनश्यामजी (ता.धानोरा), गण्यारपवार अमोल गंगाधर (चामोर्शी-मुलचेरा), नागुलवार अतुल रामन्नाजी (ता.अहेरी), गेडाम वासुदेव उरकुडा (एटापल्ली-भामरागड), भंडारी श्रीहरी नागन्ना (ता.सिरोंचा), तसेच ब-गटातून पोरेड्डीवार इशांत राजेंद्र (शेतीमाल प्रक्रिया संस्था), क-गटातून पोरेड्डीवार अरविंद नामदेवराव (कृषी पणन संस्था), ई-गटातून वाघरे सुलोचना खुशालराव (विणकर, ग्राहक व इतर संस्था), ग-गटातून पोरेड्डीवार प्रंचित अरविंद (नागरी सहकारी बँका), य-गटातून पोरेड्डीवार प्रकाश नामदेवराव (इतर सहकारी संस्था), ड-गट लाकडे बळवंत मारोतराव (वैयक्तिक भागधारक व इतर), र-गटातून वालदे हिरालाल जीवन (अजा, अज राखीव), देशमुख शशिकला ज्ञानेश्वर (महिला राखीव), नाकाडे मीराबाई यादवराव (महिला राखीव), ऐलावार बंडूजी सोमन्नाजी (विजा, भज, विमाप्र राखीव), वाढई भैयाजी मारोती (इमाव राखीव) यांचा समावेश आहे.
प्रंचित पोरेड्डीवार पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होणार
(फोटो)
बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत त्यांच्या संपूर्ण संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाल्यामुळे अध्यक्षपदी पुन्हा प्रंचित पोरेड्डीवार यांनाच संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विभागीय सहनिबंधक (नागपूर) हे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी अधिसूचना काढतील. त्यानंतर १५ दिवसांच्या आत ही निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.