नजरअंदाज पीक आणेवारी ७२ पैसे
By admin | Published: October 7, 2016 01:28 AM2016-10-07T01:28:33+5:302016-10-07T01:28:33+5:30
कृषी व महसूल विभागाने सप्टेंबर महिन्यात केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील पीक परिस्थिती चांगली असून
खरीप हंगाम : १ हजार ५३९ गावांमध्ये पेरणी
गडचिरोली : कृषी व महसूल विभागाने सप्टेंबर महिन्यात केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील पीक परिस्थिती चांगली असून जिल्हाभराची सरासरी आणेवारी ७२ पैसे आढळून आली आहे. बहुतांश तालुक्याची आणेवारी ६० पैशांच्या वरच आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने धान, तूर, कापूस, सोयाबिन या पिकांची लागवड करण्यात येते. यावर्षीच्या पावसाळ्यात अगदी सुरूवातीपासून चांगला पाऊस झाला. त्यामुळे पेरणी, धानाच्या रोवणीची कामे अत्यंत वेळेवर झाली. त्यानंतरही अगदी वेळेवर पाऊस झाल्याने शेतीची कामे वेळेवर झाली. मागील आठवड्यात जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धानपिकाला मोठा दिलासा मिळाला आहे. बहुतांश तलाव व बोड्या तुडूंब भरून आहेत. त्यामुळे उत्पादन चांगले होईल, असा अंदाज नजर अंदाज पाहणीत व्यक्त करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८८ महसुली गावे आहेत. यापैकी १ हजार ५३९ गावांमध्ये खरीप पिकांची लागवड केली जाते. ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी आल्यास संबंधित गावाला शासनाकडून दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत केले जाते. यावर्षीच्या हंगामात १४८० गावांची आणेवारी ५० पैशांच्या वर आहे. अंतिम आणेवारी जानेवारी महिन्यात घोषीत करण्यात येते.
यासाठी दोन महिन्यांचा कालावधी असला तरी पिकांची स्थिती लक्षात घेतली तर पैशाची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी होणार नाही, अशी शक्यता महसूल विभागातील अधिकारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)
५९ गावांमध्ये खरिपाचे उत्पादन नाही
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८८ गावे आहेत. त्यापैकी १ हजार ५३९ गावांमध्ये खरीपाचे उत्पादन घेतले जाते. मात्र ५९ गावांमध्ये यावर्षी खरीप पिकांची लागवडच करण्यात आली नाही. यामध्ये धानोरा तालुक्यातील सहा, चामोर्शी तालुक्यात सहा, आरमोरी तालुक्यात एक, कुरखेडा पाच, कोरची सहा, अहेरी सहा, एटापल्ली दोन, भामरागड २२ व सिरोंचा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे.
अंतिम आणेवारीवरून ठरणार मदत
सध्या काढण्यात आलेली आणेवारी ही नजरअंदाज आणेवारी आहे. राज्यभरातील पिकांची स्थिती कळावी, यासाठी महसूल व कृषी विभागाची कर्मचारी प्रत्येक गावातील पिकांची पाहणी करून त्यानुसार आणेवारी काढतात. मात्र अजूनपर्यंत पूर्णपणे पीक निघाले नाही. पीक काढतेवेळी पाऊस सुरू राहिल्यास ओला दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता काढलेली आणेवारी ही अंतिम नाही. अंतिम आणेवारी जवळपास डिसेंबर, जानेवारी महिन्यात जाहीर केली जाते. तेव्हा बहुतांश खरीप पिके निघालेली असतात. त्यामुळे सदर आणेवारी अंतिम समजली जाते व त्यावरूनच सदर गावाला दुष्काळग्रस्त घोषीत करणे किंवा न करणे याबाबतचा निर्णय घेतला जातो. मागील वर्षी बहुतांश गावांची पैसेवारी कोरड्या दुष्काळामुळे ५० पैशांपेक्षा कमी होती. यावर्षी मात्र बहुतांश गावांची आकडेवारी ५० पैशांपेक्षावर आहे.