निवृत्त शिक्षक भरतीवरून बेरोजगारांनी व्यक्त केला रोष; आंदोलन करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 03:15 PM2024-08-30T15:15:58+5:302024-08-30T15:17:06+5:30
गडचिरोलीत बैठक : ५ सप्टेंबरला तोंडाला काळ्याफिती बांधणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपातील शिक्षक भरतीवर जिल्ह्यातील डी.एड. - बी.एड. झालेले बेरोजगार प्रचंड नाराज आहेत. यासंदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी २७ ऑगस्ट रोजी येथील संविधान सभागृहात बेरोजगारांची सहविचार बैठक पार पडली. या सभेत ५ सप्टेंबर शिक्षकदिनी डोळ्यांवर काळ्याफिती लावून आंदोलन करण्याबाबत ठरविण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी धर्मानंद मेश्राम होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा कार्यकर्ते राज बन्सोड, विनोद मडावी, रेमाचंद निकुरे, अंकुश कोकोडे उपस्थित होते. सध्या चालू असलेल्या शिक्षक भरतीविषयी बेरोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून जिल्हा हा मागास जिल्हा आहेच; पण येथे रोजगारही दुर्मीळ होत आहे. अशातच शिक्षक भरतीमध्ये बेरोजगारांना डावलून सरकार निवृत्त शिक्षकांना सेवेत घेत आहे.
इतर जिल्ह्यातील अर्ज मोठ्या प्रमाणात येत असल्याने जिल्ह्यातील युवकांवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे बेरोजगार आता आक्रमक झाले असून जिल्हाभरातून पात्रताधारक बेरोजगार एकत्रित येऊन डी.एड. बी.एड. बेरोजगार संघटनेची स्थापना करून शासनासह मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्या विरोधात ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी डोळ्यांवर काळ्या फिती बांधून आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू करणार आहेत. आंदोलन तीव्र केले जाणार आहे.
जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी ५ सप्टेंबरच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले बहुसंख्य बेरोजगार उपस्थित होते.
टीएआयटीची अट रद्द करावी
बैठकीत निवृत्त शिक्षकांना रुजू न होऊ देण्यासाठी गावांगावात जाऊन ग्रामसभा व ग्रामपंचायतला ठराव घेण्यासाठी युवक आवाहन करणार आहेत. विशेष मागास जिल्हा म्हणून भरती प्रक्रियेत सीटीईटी व टीएआयटी परीक्षेची अट शिथिल करून जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य द्यावे. बाहेर जिल्ह्यातील उमेदवार घेऊ नयेत याकरिता लक्षवेधी लढा उभा करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.
... तर मतदानावर बहिष्कार टाकणार
जिल्ह्यातील बेरोजगारांचा विचार न करता बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना घेण्यात येईल, तसेच सेवानिवृत्त शिक्षक भरती रद्द करण्यात आली नाही तर आगामी निवडणुकीत बेरोजगार युवक मतदानावर बहिष्कार टाकणार असा, इशारासुद्धा देण्यात आला.