दुर्दैवी! माहेरी आलेल्या बहिणीवर भावाचे अंत्यदर्शन घेण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2023 05:28 PM2023-04-12T17:28:43+5:302023-04-12T17:29:38+5:30
Gadchiroli News भावाची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी बहीण पतीसमवेत माहेरी आली, पण त्यापूर्वीच भावाने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविली. त्यामुळे भावाचे अंतिम दर्शन घेण्याची वेळ तिच्यावर आली.
गडचिरोली : भावाची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी बहीण पतीसमवेत माहेरी आली, पण त्यापूर्वीच भावाने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविली. त्यामुळे भावाचे अंतिम दर्शन घेण्याची वेळ तिच्यावर आली. बहीण- भावाच्या नात्यातील हा हळवा अन् दुर्दैवी प्रसंग १२ एप्रिलला तालुक्यातील तुकूम येथे अनुभवयास आला.
रमेश मनकेेर गावडे (३०, रा. तुकूम, ता. धानोरा) असे मृताचे नाव आहे. रमेशची पत्नी मिरची तोडणीसाठी तेलंगणाला गेली होती. घरी लहान भाऊ, भावजय व रमेश असे तिघे होते. दरम्यान, प्रकृती बरी नसल्याने भाऊ आपल्या पत्नीसमवेत दवाखान्यात गेला होता. त्यामुळे घरी रमेश एकटाच होता. घरी कोणी नसताना रमेशने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, दुपारी १२ वाजता मीचगाव (ता.धानोरा) येथील त्याची बहीण व भावजी हे तुकूम येथे पोहोचले. तेव्हा रमेशने गळफास लावल्याचे आढळले. दोर कापून भावजीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. बहीण-भावाची भेट अधुरीच राहिली. बहिणीवर त्याचे अंतिम दर्शन घेण्याचा कटू प्रसंग ओढावला.
दोन वेळा केला होता प्रयत्न
पोलिस सूत्रांनुसार, रमेश गावडे याला दारूचे व्यसन होते. त्याने यापूर्वी दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेने कुटुंबीय शोकाकुल झाले. धानोरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.