Gadchiroli Farmer | दुर्दैवी! नापिकीचा धक्का असह्य; रात्री शेतात जाऊन घेतलं विष
By गेापाल लाजुरकर | Published: December 30, 2022 10:15 PM2022-12-30T22:15:59+5:302022-12-30T22:16:46+5:30
गडचिरोलीच्या रेगडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या
गाेपाल लाजुरकर, चामाेर्शी/घाेट (गडचिराेली) : सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकट ओढवून त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला यंदाच्याही नापिकीचा धक्का असह्य झाला. या धक्क्यातच त्याने रात्री स्वत:ची शेती गाठून विष प्राशन करीत आत्महत्या केली. ही घटना चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे शुक्रवारी (दि.३० डिसेंबर) उघडकीस आली.
दिगंबर नरोटे (वय ४२, रा. रेगडी) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नराेटे यांना सतत नापिकीला सामाेरे जावे लागले. याच नैराश्येतून त्यांनी गुरुवारी रात्री स्वत:च्या शेतावर जाऊन विष प्राशन करीत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिस मदत केंद्र रेगडी येथे देण्यात आली. पाेलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात चामोर्शी येथे पाठविला. रेगडी पोलिस मदत केंद्रात या घटनेबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास प्रभारी अधिकारी नंदकुमार शिंब्रे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक वलथरे करीत आहेत. विशेष म्हणजे, मृत हे रेगडी येथील गाव मुखिया फकिरा नरोटे यांचे भाऊ होत. नापिकीमुळेच दिगंबर नराेटे यांनी आत्महत्या केली, अशी कुजबुज लाेकांमध्ये हाेती, पाेलिसांनीही याला दुजाेरा दिला.