महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर साजरी झाली अनोखी राखीपौर्णिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 07:03 AM2020-08-04T07:03:27+5:302020-08-04T07:18:31+5:30
सततचे लॉकडाऊन आणि सीमाबंदीच्या मर्यादेमुळे अनेक भावा-बहिणींसाठी प्रत्यक्ष राखी बांधण्याचा प्रसंग यावर्षी अशक्य झाला. मात्र सर्व अडचणींवर मात करत महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर सोमवारी रंगलेल्या रक्षाबंधनाच्या सोहळ्याने कोरोनाच्या बंधनांवरही मात केल्याचे दिसून आले.
कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भावा-बहिणीतील उत्कट प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या सणाला भावाच्या हातावर राखी बांधल्याशिवाय कोणत्याही बहिणीला चैन पडत नाही. हीच स्थिती भावाचीही असते. असे असले तरी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे, सततचे लॉकडाऊन आणि सीमाबंदीच्या मर्यादेमुळे अनेक भावा-बहिणींसाठी प्रत्यक्ष राखी बांधण्याचा प्रसंग यावर्षी अशक्य झाला. मात्र सर्व अडचणींवर मात करत महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर सोमवारी रंगलेल्या रक्षाबंधनाच्या सोहळ्याने कोरोनाच्या बंधनांवरही मात केल्याचे दिसून आले.
सिरोंचा तालुक्याचे आणि प्राणहिता व गोदावरील नदीपलिकडील तेलंगणा राज्याचे रोटी-बेटीचे व्यवहार चालतात. त्यामुळे नदीच्या दोन तिरांवर राज्य आणि भाषा बदलत असली तरी दोन्ही प्रदेशात रक्ताचे नाते आहे. अनेक व्यवहारातही ते एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांच्या या व्यवहारात आजपर्यंत कशाचीही आडकाठी आली नाही. पण गेल्या ४ महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सीमेपलिकडे जाणे-येणे जवळजवळ ठप्पच होते. यादरम्यान कोणतेही मोठे सण नसल्यामुळे लॉकडाऊनचा फारसा परिणाम त्यांच्या भावनिक नातेसंबंधांवर झाला नाही, मात्र रक्षबंधनाच्या सणाला भावाच्या हातावर राखी बांधायचीच, असा निश्चय करणाऱ्या अनेक बहिणी आणि तेवढ्याच निश्चयाने पुढे सरसावलेले त्यांचे भाऊ यांचा अनोखा मिलाप राज्य सीमेवरील प्राणहिता नदीवर सोमवारी झाला.
तेलंगणातल्या करीमनगर जिल्ह्यातून आलेले भाऊ आणि सिरोंचा तालुक्यातून आलेल्या बहिणी तर काही सिरोंचा तालुक्यातील भाऊ आणि तेलंगणा राज्यातील बहिणी सीमेवरील पोलीस चौकीत जमत होते. तिथेच भावाला राखी बांधून त्याचे तोंड करताच बहिणीच्या चेहºयावर अनोखे समाधान झळकत होते. याचवेळी भावाकडून मिळालेली प्रेमाची ओवाळणी लाखमोलाची असल्याचा आनंद बहिणींच्या चेहºयावर दिसत होता.
पोलीस जवानांनाही मिळाले बहिणीचे प्रेम
आपल्या कुटुंबियांपासून कोसो दूर राहून कर्तव्य बजावणाºया सीमेवरील पोलीस जवानांनाही अनेक महिलांनी राख्या बांधून ‘तू सुद्धा आमचे रक्षण करणारा भाऊच आहेस’ असे म्हणत त्यांचेही तोंड गोड केले. यामुळे ते जवानही भावुक झाल्याचे जाणवत होते.