अनोखा उपक्रम! 'तुमचे लायसन्स दाखवा' असे म्हणणारे पोलीसच 'येथे' काढून देतात शिकाऊ वाहन परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 09:05 PM2021-11-09T21:05:45+5:302021-11-09T21:09:42+5:30
Gadchiroli News व्यंकटापूर उपपोलीस स्टेशनतर्फे ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून लर्निंग लायसन्स मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
गडचिरोली : दुचाकीने रस्त्यावरून जात असताना शिट्टी मारून गाडी थांबवत 'तुमचे लायसन्स दाखवा' असे म्हणणारे वर्दीतले पोलीसच शिकाऊ वाहन परवाना (लर्निंग लायसन्स) काढून देत आहेत, असे म्हटले तर कदाचित विश्वास बसणार नाही; परंतु हे खरं असून व्यंकटापूर पोलीस हा उपक्रम राबवीत आहेत. हा उपक्रम नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत सुरू राहणार आहे.
व्यंकटापूर उपपोलीस स्टेशनतर्फे ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून लर्निंग लायसन्स मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत उपपोलीस स्टेशन हद्दीतील अतिदुर्गम व नक्सलदृष्ट्या अतिसंवेदनशील अंबेझरा, लंकाचेन, कनेर्ली, कोत्तागुडम, चिन्नावट्रा, आवलमारी, पेद्दावट्रा आदी गावातील तसेच इतर भागातील तब्बल ३१२ आदिवासी बांधवांना व्यंकटापूर येथे बोलावून त्यांना शिकाऊ परवानाच काढून देण्यात आला.
नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून लर्निंग लायसन्स शिबिर ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आले. दररोज २५ ते ३० नागरिक या शिबिरात आपले लर्निंग लायसन्स काढत आहेत. नागरिकांच्या विनंतीवरून हा मेळावा ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. याचा लाभ दुर्गम व ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी केले.
विविध भागातून भरपूर प्रतिसाद
व्यंकटापूरसारख्या अतिग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कचा अभाव आहे. सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येतात. अशा अनेक संकटांवर मात करून व्यंकटापूर उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी डॉ. मिलिंद कुंभार यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सिरोंचा, आसरअल्ली,आष्टी, चामोर्शी अशा अनेक ठिकाणच्या नागरिकांनी कॅम्पमधून आपले व मित्र परिवाराचे लर्निंग लायसन्स काढून घेत सदर योजनेचा लाभ घेत आहेत.