अन्यायाविरोधात एकजूट व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:03 AM2018-03-12T00:03:42+5:302018-03-12T00:03:42+5:30
ग्रामसभा कोडसेलगुडम (कमलापूर) येथे पेरमिली इलाका पारंपरिक पट्टीतील सर्व ग्रामसभांतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अन्याय, अत्याचाराविरोधात महिलांनी आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
कमलापूर : ग्रामसभा कोडसेलगुडम (कमलापूर) येथे पेरमिली इलाका पारंपरिक पट्टीतील सर्व ग्रामसभांतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अन्याय, अत्याचाराविरोधात महिलांनी आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पेरमिलीच्या सुमन मेश्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कोडसेलगुडमच्या सुगंधा साकाटी होत्या. याप्रसंगी पेन कुपार लिंगो, सावित्रीबाई फुले, राणी दुर्गावती, वीर बाबुराव शेडमाके, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
त्यानंतर नीलिमा करपेत, सीताबाई आलाम, बुजजी तोरेम, कमला तलांडी, लक्ष्मीबाई श्रीरामवर, जि. प. सदस्य ऋषी पोरतेट, येरमणारचे सरपंच बालाजी गावडे, शंकर आत्राम, कैलास कोरेत, बाजीराव तलांडी, प्रमेश वेलादी, तिरुपती कुळमेथे, लक्ष्मण कोडापे यांनी स्त्री आणि पुरुषांमध्ये कुठलाही भेदभाव न करता त्यांना समान संधी द्यावी. तसेच महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्या, असे प्रतिपादन केले. तसेच देशामध्ये महिलांवर ढोंगी बाबांकडून बलात्कार होत आहेत. त्यांना कठोर शिक्षा करावी, दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी महिलांवरही अन्याय, अत्याचार होत आहेत. हे अन्याय अत्याचार थांबवावे, दुर्गम गावातील महिलांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, तसेच अन्याय अत्याचार करणाºयांवर कठोर कारवाई करावी, यासाठी महिलांनीही शासन, प्रशासनावर दबाव आणावा, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
प्रास्ताविक कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत तर आभार संतोष सिडाम यांनी केले. यावेळी पेरमिली इलाका पारंपरिक पट्टीमध्ये येणारे पेरमिली, राजाराम खांदला, कामलापूर, दमारांचा, उमानूर, जिमलगट्टा येथील ग्रामस्थ हजर होते.