विद्यापीठाने शिक्षण शुल्क वाढविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:23 AM2018-06-21T01:23:55+5:302018-06-21T01:23:55+5:30

स्थानिक गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने यावर्षी सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून सर्व शाखांच्या पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्कामध्ये दीड ते दोन हजार रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी अडचणीत सापडले आहे.

The university increased the education fee | विद्यापीठाने शिक्षण शुल्क वाढविले

विद्यापीठाने शिक्षण शुल्क वाढविले

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना फटका : प्रत्येक अभ्यासक्रमाच्या शुल्कात दीड ते दोन हजारांनी वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने यावर्षी सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून सर्व शाखांच्या पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्कामध्ये दीड ते दोन हजार रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी अडचणीत सापडले आहे.
अनुदानित तत्त्वावर जिल्ह्याच्या अनेक महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क गतवर्षी इतके स्थिर आहे. मात्र विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित तत्त्वावर असलेल्या अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क वाढविण्यात आले आहे. विनाअनुदानित महाविद्यालयात प्राचार्यांसह प्राध्यापकांची सर्व पदे पूर्णत: भरण्यात यावी, असे निर्देश विद्यापीठ प्रशासनाने दिले होते. याला विनाअनुदानित महाविद्यालयाच्या संस्थांनी प्रतिसाद दिला. मात्र विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेतन मिळत नसल्याने यासाठीच्या खर्चाची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावर विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने विनाअनुदानित महाविद्यालयाच्या विविध अभ्यासक्रमांच्या शिक्षण शुल्कात वाढ केली.
सद्य:स्थितीत पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क आठ ते दहा हजार रूपयांच्या घरात पोहोचले आहे. गतवर्षी बीएसस्सी अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क ६ हजार ७५० रूपये होते. यंदा हे शिक्षण शुल्क ७ हजार ७२९ रूपये आहे. एमकॉम व एमबीए अभ्यासक्रमाच्याही शिक्षण शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती शासन करीत असते. शासनाकडून मंजूर झाल्यानंतर हे शुल्क महाविद्यालयांना मिळते.
असे आहे अभ्यासक्रमनिहाय यंदाचे शिक्षण शुल्क
गोंडवाना विद्यापीठाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालय विद्यापीठ परीक्षा शुल्क, प्रात्यक्षिक शुल्क व पदवी शुल्क संबंधित प्रवेशित विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमनिहाय घेत असतात. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी कला व वाणिज्य शाखा पदवी अभ्यासक्रमाकरिता भागा १, भाग २ व भाग ३ साठी ८०० रूपये शिक्षण शुल्क अनुदानित तुकडीसाठी आकारले जात आहे. याच शाखांच्या अभ्यासक्रमाकरिता विनाअनुदानित तुकडीसाठी भाग १ ते ३ वर्गांना प्रत्येकी ५ हजार ४९६ इतके शिक्षण शुल्क निश्चित करण्यात आले आहे. कायम विनाअनुदानित तुकडी असलेल्या कला, वाणिज्य शाखेतील पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी (उदा. बीएसस्सी/एमए) करिता प्रत्येक वर्षी ७ हजार ७२९ इतके शिक्षण शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
प्रलंबित शिक्षण शुल्काने महाविद्यालये अडचणीत
गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयात शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची रक्कम महाविद्यालयांना शासनाकडून अदा करण्यात आली नाही. आदिवासी व बिगर आदिवासी विद्यार्थ्यांचे सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन शैक्षणिक सत्रातील शिक्षण शुल्काची रक्कम महाविद्यालयांना मिळाली नाही. काही विद्यार्थ्यांची सन २०१५-१६ सत्रातील शिक्षण शुल्काची रक्कम प्रलंबित आहे. त्यामुळे महाविद्यालये व संस्था अडचणीत सापडले आहेत.

Web Title: The university increased the education fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.