युवक-युवतींना स्वावलंबी बनविण्यासाठी विद्यापीठाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 05:00 AM2022-01-13T05:00:00+5:302022-01-13T05:00:35+5:30
विद्यापीठाशी संलग्नित चंद्रपूर व गडचिराेली या दाेन्ही जिल्ह्यातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नवीन पाऊल उचलले आहे. दरम्यान, प्रशिक्षणासह प्रात्यक्षिक व राेजगार मेळावा घेऊन यातून विद्यार्थ्यांना राेजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाेंदणी सुरू करण्यात आली आहे.
दिलीप दहेलकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : स्थानिक गाेंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ कॅम्पसमधील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना राेजगारातून स्वावलंबी बनविण्यासाठी विद्यापीठाचे नवे कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे यांनी आपला ‘ड्रीम प्राेजेक्ट’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली असून, या प्राेजेक्टचे कामही सुरू झाले आहे.
विद्यापीठाशी संलग्नित चंद्रपूर व गडचिराेली या दाेन्ही जिल्ह्यातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नवीन पाऊल उचलले आहे. दरम्यान, प्रशिक्षणासह प्रात्यक्षिक व राेजगार मेळावा घेऊन यातून विद्यार्थ्यांना राेजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाेंदणी सुरू करण्यात आली आहे. हा प्राेजेक्ट यशस्वीपणे राबविण्यासाठी काही दिवसापूर्वी विद्यापीठात कुलगुरू डाॅ. प्रशांत बाेकारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी अधिकारी उपस्थित हाेते.
मे महिन्यात हाेणार राेजगार मेळावा
विद्यापीठाच्या वतीने गडचिराेली, चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दाेन महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या दाेन महिन्यामध्ये विद्यार्थी शासकीय कार्यालयात जाऊन इंटर्ननशिप करणार आहेत. प्रत्येक कार्यालयात विद्यार्थ्यांना काम देण्यात येणार असून, दाेन महिन्यासाठी विद्यापीठाकडून स्टायपंड मिळणार आहे. दाेन महिन्यामध्ये विद्यार्थी अनुभवाने तयार हाेऊन त्यांच्यात आत्मविश्वास वाढणार आहे. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकासही वाढणार आहे. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर साधारणत: मे महिन्यात विद्यापीठाच्या वतीने गडचिराेली येथे संबंधित प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा राेजगार मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे उद्याेजक, प्रतिनिधी उपस्थित राहून विद्यार्थ्यांची राेजगारासाठी निवड करणार आहेत.
लाेकप्रतिनिधींचा राहणार सहभाग
- विद्यापीठाच्या वतीने हा ड्रीम प्राेजेक्ट राबविण्याकरिता दाेन्ही जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींचा सहभाग घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दाेन्ही जिल्ह्यातील आमदार व खासदारांशी यासंदर्भात चर्चा केली असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला असल्याची माहिती आहे.
- विदर्भ असाेसिएशनच्या प्रतिनिधींशी यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.
मनुष्यबळ पुरविण्यावर भर
विद्यापीठातून केवळ पदवी घेऊन त्याचा उपयाेग नाही. शिक्षणाचा खऱ्या अर्थाने उपयाेग हाेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्यातील काैशल्य प्रत्यक्ष राेजगार निर्मितीसाठी कामी येणे गरजेचे आहे. हाच संकल्प ठेवून विद्यापीठाच्या वतीने राेजगार निर्मितीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. इंटर्नशिपच्या माध्यमातून शासकीय कार्यालयाला माेफत मनुष्यबळ पुरविण्यावर भर दिला जात असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा झाली आहे.
विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना राेजगार मिळवून देण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येत आहे. गुगल फाॅर्मवरून विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाेंदणी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जाची छाननी करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध विभागाच्या शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. यासाठीचा मासिक भत्ता तसेच विद्यार्थ्यांच्या निवास व भाेजनाची व्यवस्था विद्यापीठ प्रशासन उचलणार आहे.
- डाॅ. अनिल चिताडे, कुलसचिव,
गाेंडवाना विद्यापीठ, गडचिराेली