विद्यापीठ परिवर्तनाचे केंद्र व्हावे

By Admin | Published: October 3, 2016 02:07 AM2016-10-03T02:07:53+5:302016-10-03T02:07:53+5:30

राज्य व देशातील विद्यापीठे केवळ ज्ञानदान करणारी केंद्रे राहिली नाहीत. विद्यापीठातून जीवनमूल्य, संस्कार घडून व्यक्तिमत्त्व विकास व्हावा,

The university should be the center of the transformation | विद्यापीठ परिवर्तनाचे केंद्र व्हावे

विद्यापीठ परिवर्तनाचे केंद्र व्हावे

googlenewsNext

अनिल सोले यांचे प्रतिपादन : गोंडवाना विद्यापीठातर्फे सेवाव्रती, प्राचार्य, शिक्षक, कर्मचाऱ्यांचा गौरव
गडचिरोली : राज्य व देशातील विद्यापीठे केवळ ज्ञानदान करणारी केंद्रे राहिली नाहीत. विद्यापीठातून जीवनमूल्य, संस्कार घडून व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, गोंडवाना विद्यापीठ सुसंस्कार व परिवर्तनाचे केंद्र व्हावे, असे प्रतिपादन पदवीधर मतदार संघ नागपूरचे आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या पाचव्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या शानदार सोहळ्यात रविवारी गोंडवाना विद्यापीठातर्फे उत्कृष्ट कार्यांसाठी समाजसेवक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर होते. सत्कारमूर्ती तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंदाकिनी आमटे, गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. नंदाजी सातपुते, प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट, डॉ. राजेश गायधनी, डॉ. चंद्रशेखर कुंभारे, डॉ. पी. अरूणप्रकाश, समीर केने, डॉ. प्रतिभा जिवतोडे, स्वप्नील दोंतुलवार, विद्यापीठाचे कार्यकारी कुलसचिव डॉ. श्रीराम रोकडे, परीक्षा नियंत्रक डॉ. जे. व्ही. दळवे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. व्ही. सी. सिल्हारे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आ. प्रा. अनिल सोले व कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना जीवन साधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, शिल्ड व रोख २५ हजार रूपये देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार गोंविदराव मुनघाटे कला, विज्ञान महाविद्यालय कुरखेडाला प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी स्वीकारला. त्यांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, शिल्ड व रोख २५ हजार रूपये देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार महात्मा गांधी कला विज्ञान आणि स्व. नसरूद्दीन पंजवानी वाणिज्य महाविद्यालय आरमोरीचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांना प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामध्ये शाल, श्रीफळ, शिल्ड, प्रमाणपत्र व रोख १५ हजार रूपयांचा समावेश आहे. याशिवाय उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालय कर्मचारी तसेच उत्कृष्ट विद्यार्थी व विद्यार्थिनींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुढे बोलताना आमदार प्रा. अनिल सोले म्हणाले, पावसाळी अधिवेशनात आपण गोंडवाना विद्यापीठाला जागा मिळण्याबाबतचा विषय पटलावर ठेवला होता. मात्र या विषयावर चर्चा होऊ शकली नाही. पुन्हा आगामी हिवाळी अधिवेशनात गोंडवाना विद्यापीठाच्या जागेचा विषय आग्रहीपणे मांडणार, असे त्यांनी सांगितले. गोंडवाना विद्यापीठाचे काम गतिशील होणे गरजेचे आहे. सध्याच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात नव्या अभ्यासक्रमाच्या व्यवस्थेत गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धेत टिकले पाहिजे, या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विद्यार्थी घडवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ. कल्याणकर म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाचे आॅनलाईन प्रश्नसंच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. विद्यापीठ प्रशासनाने पदवी पडताळणीसाठी आॅनलाईन सुविधा निर्माण केली असून भविष्याचा वेध घेऊन विद्यापीठाचा सर्व रेकार्ड डिजीटल फार्ममध्ये करण्यात आला आहे. याबाबत डेटाएन्ट्री निर्मितीचा प्रारंभ वर्षभरात करू, असेही डॉ. कल्याणकर यावेळी म्हणाले. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आणखी २० कोर्सेस सुरू होणे गरजेचे आहे. हा विद्यार्थ्याचा हक्क आहे. शिवाय अतिरिक्त कोर्सेसही सुरू होणे आवश्यक आहे. विद्यापीठाला नॅकला सामोरे जावे लागणार आहे. त्या दृष्टीने विद्यापीठ प्रशासन प्रयत्न करेल, असेही डॉ. कल्याणकर यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, डॉ. दिगंत आमटे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार विद्यापीठाचे कार्यकारी कुलसचिव डॉ. श्रीराम रोकडे यांनी केले तर संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयाचे संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The university should be the center of the transformation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.