कुरखेडा नगर पंचायत अध्यक्षपदी आशा तुलावी यांची अविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 10:17 PM2020-11-09T22:17:21+5:302020-11-09T22:18:46+5:30
नगराध्यक्षपदासाठी भाजप समर्थित शाहेदा मुघल यांनी तर महाविकास आघाडीतर्फे आशा तुलावी यांनी नामांकन सादर केले होते. मात्र शाहेदा मुघल यांचे नामांकन रद्द करण्यात आले. त्यामुळे आशा तुलावी यांचा एकच अर्ज शिल्लक होता. ९ नोव्हेंबर रोजी विशेष सभा आयोजित केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा नगर पंचायतीच्या अध्यक्षपदावर महाविकास आघाडीच्या आशा तुलावी यांची अविरोध निवड झाली. नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ २० दिवसानंतर संपणार असल्यामुळे तुलावी यांना केवळ २० दिवस या पदावर राहण्याची संधी मिळाली आहे. त्यानंतर कार्यकाळाला मुदतवाढ मिळते, की सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत प्रशासक बसविला जातो, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी भाजप समर्थित शाहेदा मुघल यांनी तर महाविकास आघाडीतर्फे आशा तुलावी यांनी नामांकन सादर केले होते. मात्र शाहेदा मुघल यांचे नामांकन रद्द करण्यात आले. त्यामुळे आशा तुलावी यांचा एकच अर्ज शिल्लक होता. ९ नोव्हेंबर रोजी विशेष सभा आयोजित केली होती. या सभेत आशा तुलावी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी शिवसेना गटनेते डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, काँग्रेसचे माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, प्रल्हाद कराडे, माजी शिवसेना तालुका प्रमुख आशिष काळे, जयेंद्र चंदेल, पं.स. उपसभापती श्रीराम दुग्गा, माजी जि. प. सदस्य अशोक इंदूरकर, पं. स. सदस्य गिरीधर तितराम, शोहेब मस्तान, पुुंडलिक निपाणे, जयश्री धाबेकर, अनिता बोरकर, चित्रा गजभिये, पुंडलिक देशमुख, सोनू भट्टड, मनोज सिडाम, उस्मान पठाण आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एसडीओ समाधान शेडगे, सहायक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी नमिता बांगर यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.