अवैैध तंबाखू व दारूविक्रेते होणार तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:48 AM2018-05-12T01:48:20+5:302018-05-12T01:48:20+5:30
वारंवार दारू विक्रेते व तंबाखू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात. परंतु अनेकवेळा हे विक्रेते सुटून येतात, अशा विक्रेत्यांवर यापुढे एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करावी, तडीपारीचा गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वारंवार दारू विक्रेते व तंबाखू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात. परंतु अनेकवेळा हे विक्रेते सुटून येतात, अशा विक्रेत्यांवर यापुढे एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करावी, तडीपारीचा गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
तंबाखू व दारूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या त्रैमासिक सभेचे आयोजन गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी सर्चचे संस्थापक डॉ. अभय बंग, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. शिवनाथ कुंभारे, आनंद मोडक उपस्थित होते.
बालसंरक्षण कायद्याचे जिल्ह्यात काटेकोर पालन व्हावे, १८ वर्षाखालील कोणत्याही बालकाला तंबाखू किंवा तत्सम पदार्थ विकताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बाल संरक्षण कायद्याअंतर्गत १८ वर्षांखालील मुलांना तंबाखुजन्य पदार्थ विकणे हा दंडनीय गुन्हा आहे. या कायद्यानुसार, लहान मुलांना तंबाखुजन्य पदार्थांची म्हणजे खर्रा, तंबाखू, नस, गुडाखू यांची विक्री करणाऱ्यास १ लाख रुपये दंड व सात वर्षांची सक्त मजुरी अशी शिक्षा आहे. त्या अनुषंगाने कारवाई करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी सर्चचे संस्थापक डॉ. अभय बंग, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनीही विचार व्यक्त केले. बैठकीला पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रूग्णालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पानठेल्यांची होणार नोंदणी
जिल्हाभरात किती पानठेले आहेत, किती पानठेल्याची शॉप अॅक्टनुसार नोंदणी झाली आहे, याबाबतची माहिती प्रत्येक ग्रामपंचायत व नगर परिषद/नगर पंचायत प्रशासनाकडून प्राप्त करावी, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.