पोलिसांनी आवळल्या बेशिस्त वाहनचालकांच्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:00 AM2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:21+5:30

गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर व वाहतूक शहर शाखा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम गोरे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली शहरात व नगर पालिकेच्या हद्दीत वाहतूक सुरळीत करण्यासोबतच वाहतुकीला शिस्त लावण्याच्या कामासाठी २० पोलीस शिपाई कार्यरत आहेत. यामध्ये एक महिला अधिकारी व २० शिपाई मिळून २१ जणांची टीम आहे.

Unruly drivers caught by the police | पोलिसांनी आवळल्या बेशिस्त वाहनचालकांच्या मुसक्या

पोलिसांनी आवळल्या बेशिस्त वाहनचालकांच्या मुसक्या

Next
ठळक मुद्देमहिनाभरात २ हजार ३४७ वाहनांवर कारवाई; गडचिरोली शहर वाहतूक शाखेने वसूल केला ५ लाख २६ हजारांचा दंड

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाच्या संचारबंदीत बहुतांश नागरिक बाहेर कुठेही न फिरता घरीच राहून जीवन व्यतीत करीत आहेत. मात्र वाढत्या तापमानात काटेकोरपणे कर्तव्याचे पालन करीत गडचिरोली पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या वाहतूक पोलिसांनी बेशिस्त व विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. २० मार्च ते २१ एप्रिल २०२० महिनाभरात तब्बल २ हजार ३४७ वाहनांवर कारवाई करून तब्बल ५ लाख २६ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर व वाहतूक शहर शाखा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम गोरे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली शहरात व नगर पालिकेच्या हद्दीत वाहतूक सुरळीत करण्यासोबतच वाहतुकीला शिस्त लावण्याच्या कामासाठी २० पोलीस शिपाई कार्यरत आहेत. यामध्ये एक महिला अधिकारी व २० शिपाई मिळून २१ जणांची टीम आहे. यामध्ये १० महिलांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी २२ मार्चपासून राज्यात व देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर संचारबंदीची मुदत वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आली. संचारबंदीच्या काळात शहरातील वाहतूक पोलीस चामोर्शी, आरमोरी, धानोरा, मूल या चार मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी तसेच इंदिरा गांधी चौकात तैनात राहून बेशिस्त व विनापरवाना दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर कारवाई करीत आहेत.

ई-चलान मशीनने प्रक्रिया झाली सुलभ
वाहतूक शहर शाखेत कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांकडे ई-चलान मशीन उपलब्ध असून जून २०१९ पासून मोक्यावर जेव्हाच्या तेव्हा चलानची कारवाई केली जात आहे. यापूर्वी न्यायालयात चलान भरून वाहन सोडवावे लागत होते. मात्र आता स्पाट ई-चलानमुळे वाहतूक पोलीस व वाहनधारकांसाठी ही प्रक्रिया सुलभ झाली आहे. दोघांचाही वेळ वाचत आहे. ई-चालान मशीनमध्ये वाहनाचा फोटो, चालक फोटो, वाहन क्रमांक, परवाना, चालक व मालकाचा मोबाईल क्रमांक आदी नमूद करून कोणत्या कलमान्वये कारवाई केली जात आहे. या कलमाचाही उल्लेख केला जात आहे. या मशीनमधून दंडाची पावती मिळत आहे. परवाना जवळ नसलेल्या वाहनधारकांकडून २०० रुपये, परवाना मुळीच काढला नसेल तर ५०० रुपये दंड आकारला जात आहे. याशिवाय विमा, पियूसी, आरसी बुक आदी दस्ताऐवजाची पडताळणी वाहतूक पोलीस करीत आहेत.

वाहनचालकांचा सुरू आहे ब्रेन वॉश
कोरोनाच्या संचारबंदीत वाहनचालकांनी विनाकारण फिरू नये. संचारबंदीचे उल्लंघन करू नये, अशा सूचना देऊन वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांचा ब्रेन वॉश केला जात आहे. वाहन चालविताना मास्क लावा, परवाना सोबत ठेवा, शारीरिक अंतर ठेवा, असे वाहनचालकाला सांगून जनजागृती घडवून आणण्याचे काम वाहतूक पोलीस करीत आहेत.

Web Title: Unruly drivers caught by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.