जिल्हाभरात अवकाळी पावसाचा जाेर; रविवारी अनेक तालुक्यांमध्ये हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 04:34 PM2022-12-12T16:34:23+5:302022-12-12T16:35:54+5:30
मागील दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रविवारी पहाटे जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला.
गडचिराेली : रविवारी जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे कापूस उत्पादक व धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
मागील दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रविवारी पहाटे जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला. दुपारी तीननंतर अनेक भागात पावसाने हजेरी लावली. काही भागात तर दमदार पाऊस झाला. कापूस काढणीची कामे सुरू झाली आहेत. अशातच पावसाने हजेरी लावली. जो कापूस परिपक्व हाेऊन बाेंडावर आहे. तो गळून जमिनीवर पडण्याचा धाेका निर्माण झाला आहे. धानाच्या मळणीची कामे सुरू हाेती. मात्र, पावसामुळे धान मळणी थांबली आहे.
पुन्हा दाेन दिवस ढगाळ वातावरण
जिल्ह्यात पुन्हा दाेन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. यादरम्यान पाऊस काेसळण्याची शक्यता आहे. तसेच विजांचा कडकडाट हाेण्याची शक्यता असल्याने शेतकरी व नागरिकांनी शेतात काम करताना याेग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लाेखाेळी पिकाला बसणार फटका
यावर्षी जिल्ह्यात जवळपास ४९ हजार हेक्टर क्षेत्रावर लाखाेळी पिकाची लागवड करण्यात आली आहे. या पिकाला अजिबात सिंचनाची गरज भासत नाही. त्यामुळे हे पीक धान निघाल्यानंतर पेरले जाते. अवकाळी पावसाचे पाणी बांधित साचल्यास सदर पीक करपून जाते. हा धाेका आता निर्माण झाला आहे.
उत्पादित मालाचे संरक्षण करा : कृषी विभाग
हलक्या ते अति हलक्या स्वरुपाच्या अवकाळी पावसामुळे तसेच तापमानामध्ये अति घट झाल्यामुळे रब्बी हंगामातील धान पिकाच्या राेपांवर परिणाम दिसून येतो. तापमानात घट झाल्यामुळे धान राेपांची वाढ खुंटताना दिसून येते. त्याच्या व्यवस्थापनाकरिता रात्री धान पिकाच्या राेपांवर पॉलिथीन पसरवून ठेवावे जेणेकरून घटलेल्या तापमानाचा परिणाम होणार नाही. तसेच सकाळी पॉलिथीन काढून घ्यावी. त्याचप्रमाणे धान राेपांना रात्रीच्या वेळी पाणी द्यावे व सकाळी पाणी काढून टाकावे, जेणेकरून वाढ योग्य रितीने होईल.
सध्याच्या ढगाळ हवामानाचा परिणाम जिल्ह्यातील कापूस पिकांवरसुध्दा दिसून येण्याची शक्यता असल्यामुळे फुटलेल्या कापसाची वेचणी लवकरात लवकर करावी. कोरड्या ठिकाणी साठवणूक करावी. सध्याच्या ढगाळ हवामानाचा परिणाम कुक्कुटपालनावरही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कुक्कुटपालन व्यवस्थापनाकरिता तापमानातील घट भरून काढण्याच्या दृष्टीने कुक्कुटपालनातील पक्ष्यांना ऊब मिळण्याच्या दृष्टीने हॅलोजन बल्ब किंवा एअर हिटरची व्यवस्था करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली येथील जिल्हास्तरीय हवामान केंद्र यांनी केले आहे.