सोमवारपासून बेमुदत शाळाबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 10:36 PM2017-12-08T22:36:02+5:302017-12-08T22:36:22+5:30
मागील १५ वर्षांपासून शासनाचा एकही रूपयाचे वेतन (मानधन) न घेता जिल्ह्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शेकडो उच्च माध्यमिक शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.
आॅनलाईन लोकमत
कोरची : मागील १५ वर्षांपासून शासनाचा एकही रूपयाचे वेतन (मानधन) न घेता जिल्ह्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शेकडो उच्च माध्यमिक शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करूनही या कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्यात आले नाही, त्यामुळे महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कृती समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने ११ डिसेंबर सोमवारपासून शाळाबंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.
यासंदर्भात विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने कोरचीच्या तहसीलदार कुमरे व गटशिक्षणाधिकारी आबाजी आत्राम यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना शासनाने अनुदान लागू करावे, या मागणीला घेऊन आतापर्यंत तब्बल २०४ वेळा आंदोलन करण्यात आले. मात्र शासनाने अनुदानासंदर्भात शाळांची यादी तयार केली नाही. तसेच प्रत्यक्ष अनुदान लागू केले नाही. आंदोलनादरम्यान शिक्षणमंत्र्यांनी सदर प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र शिक्षणमंत्र्यांचे हे आश्वासन हवेत विरले. आपल्या हक्कासाठी शिक्षक आता सोमवारपासून बेमुदत बंद पुकारणार आहेत. या बंदच्या कालावधीत विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग पूर्णत: बंद राहणार आहेत, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.