निराधार महिलेची घरकुलासाठी धडपड
By admin | Published: July 22, 2016 01:31 AM2016-07-22T01:31:21+5:302016-07-22T01:31:21+5:30
निराधार व दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्यांना शासनाच्यावतीने घरकूल योजनेचा लाभ दिला जातो.
पेट येथील कौशल्या येरेवार यांची व्यथा : दारिद्र्य रेषेखालील असूनही योजनेतून डावलले
घोट : निराधार व दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्यांना शासनाच्यावतीने घरकूल योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेतून लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी पर्याप्त निधी स्थानिक प्रशासनाच्या पुढाकाराने पं. स. स्तरावरून उपलब्ध होतो. घरकूल लाभासाठी स्थानिक प्रशासनाचा महत्त्वाचा वाटा असतो. परंतु स्थानिक प्रशासनच निराधार व दारिद्र्य रेषेखालील लोकांना घरकूल लाभापासून डावलत असेल तर खऱ्या लाभार्थ्यांना न्याय कसा मिळणार, अशीच काहीशी स्थिती घोट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या पेट येथे उघडकीस आली आहे. येथील निराधार व दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या कौशल्या सुधाकर येरेवार या घरकुलापासून वंचित आहेत.
चामोर्शी तालुक्यातील घोट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या पेट येथील कौशल्या येरेवार या मुलगा व मुलीसह झोपडीत जीवन व्यतीत करीत आहेत. शासनाकडून घरकूल मिळावा, याकरिता त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे वारंवार अर्ज सादर केला. परंतु त्यांचे नाव बीपीएल यादीत असतांनाही योजनेच्या लाभापासून नेहमीच डावलण्यात आले. एक मुलगा व एक मुलगी यांचे पालन-पोषण त्या मोलमजुरीने करीत आहेत. ऊन, वारा, पाऊस, थंडीतही त्या झोपडीत जीवन कुंठीत करीत आहेत. दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी कष्टाची कामे करावी लागत आहेत. तर घरकूल बांधकामासाठी पैसा कुठून आणणार, असा सवाल त्या प्रशासनाला करीत आहेत. प्रशासनाच्या अनास्थेमुळे घरकुलाचा लाभ आपल्याला मिळाला नाही. दोन मुलांचा सांभाळ करताना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. तर निवाऱ्याची समस्या अधिकच गंभीर होत आहे. पावसाळ्यात सदर झोपडी कधीही कोसळू शकते. शासकीय कार्यालयात वारंवार चकरा मारून काहीच मिळाले नाही. त्यामुळे मोठ्या आशेने आपल्याकडे निवेदन सादर करीत आहे. तरी घरकुलाचा लाभ देऊन आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करावी, अशी मागणी कौशल्या सुधाकर येरेवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)