वन जमिनीसाठी ग्रामसभा व गाेटूल समितीचे उपाेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:15+5:302021-07-07T04:45:15+5:30
गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहूल आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील शहीद वीर बाबुराव शेडमाके, भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक व सांस्कृतिक, ...
गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहूल आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील शहीद वीर बाबुराव शेडमाके, भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक व सांस्कृतिक, क्रीडा व धार्मिक कार्यासाठी सिरोंचा येथे आदिवासी गोंडवाना गोटूल समितीची स्थापना केलेली आहे. सदर कार्य पार पाडण्यासाठी सामाजिक केंद्र (गोटूल) बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे. तालुक्याच्या भागातील आदिवासी गावे ही १०० टक्के आदिवासी आहेत. तालुका मुख्यालयापासून ८० ते ९० किलोमीटर अंतरावर आहेत. प्रत्येक गावात जाण्यासाठी आजही पक्के रस्ते नाहीत. आदिवासी संस्कृतीनुसार प्रत्येक गावात गोटूल आहे. गोटूलमध्ये एकत्र येऊन आदिवासी सामाजिक कार्य पार पडतात. सिरोंचा येथे २००१ पासून सर्व्हे क्र. ७१/१ मधील १ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण करून गोटूल भूमीसाठी ती जागा ताब्यात घेतली हाेती. सदर जागेचा उपयाेग आदिवासी बांधव करीत आहेत. परंतु सदर जागेवर उपवनसंरक्षकांच्या आदेशानुसार वृक्षाराेपणासाठी खड्ड्यांचे खोदकाम सुरू आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या सामाजिक कार्यासाठी निश्चित केलेली जागा हिरावली जाणार आहे. निश्चित केलेल्या जागेवर आदिवासी समाजासाठी गोटूल बांधकाम अत्यावश्यक आहे. त्यामुळे वृक्षाराेपण थांबवावे व आदिवासी समाजाच्या ताब्यात असलेली १ हेक्टर वनजमीन समाजासाठी सोडावी. तसेच वन जमिनीचा सामूहिक वनहक्क दावा मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी तालुका ग्रामसभा स्वायत्त परिषद व आदिवासी गाेंडवाना गाेटूल समितीच्या वतीने करण्यात आली.