शहरी नक्षलवादाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही - पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 05:22 AM2021-11-19T05:22:58+5:302021-11-19T05:23:25+5:30
नक्षलवाद हा सामाजिक विषय, त्याला विकास हेच उत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यात नक्षल कारवाया व त्यांचा प्रभाव कमी झाल्याचे वाटत असले तरी शहरी नक्षलवादाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकारविरूद्ध आकस निर्माण करून स्वत:साठी अनुकूल जनमत तयार करणारा एक वर्ग समाजात सक्रिय आहे. वेळीच काळजी घेऊन त्यांना नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी गडचिरोली येथे पत्रकारांशी बोलताना दिला. विदर्भ दौऱ्याअंतर्गत गुरूवारी देसाईगंज येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आटोपून ते गडचिरोलीत आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी तथा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आ. धर्मरावबाबा आत्राम, उपस्थित होते.
मी मुख्यमंत्री असताना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) माध्यमातून या भागात रस्ते बनविले होते, असे सांगून पवार यांनी दळणवळणाची साधने वाढविण्याची गरज बोलून दाखविली.
शेती व औद्योगिकीरणाला पाठबळ हवे
nविकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी शेतीचा विकास
आणि औद्योगिकरणाला पाठबळ देण्याची गरज आहे. नव्या पिढीमध्ये येत असलेले नैराश्य त्याने घालविता येईल, असे पवार म्हणाले.
nसुरजागड लोहखाणीसंदर्भात जे काही गैरसमज आहेत ते चर्चेतून दूर केले पाहिजेत. संबंधित कंपनीच्या मालकांनी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लोकांना समजावून सांगितले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
आम्हाला संघटनेसोबत सरकारही चालवायचे आहे
nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच विदर्भात राष्ट्रवादीचे दुकान बंद होईल, असे वक्तव्य केले. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, सोनियाजी दिल्लीत सर्व समविचारी पक्षांनी एकत्र राहावे अशी भूमिका व्यक्त करत असतात. त्याच्याशी सुसंगतपणे आम्ही वागत असतो.
nपक्ष वाढविण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण आम्ही पक्ष चालवत
असताना राज्याचे सरकारही चालवायचे आहे याचे भान ठेवतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
विकास हेच उत्तर
nविकासापासून वंचित असलेल्या समाजघटकाने नक्षलवादाला
प्रतिसाद दिला आणि तो फोफावत गेला. त्यामुळे हा सामाजिक-आर्थिक विषय आहे. त्याला विकास हेच उत्तर आहे. विकासात्मक कामातील अडथळे रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी काम करावे, असे पवार म्हणाले.