विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात खराब साहित्यांचा वापर
By admin | Published: October 5, 2016 02:12 AM2016-10-05T02:12:01+5:302016-10-05T02:12:01+5:30
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येमली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी
येमली जि.प. शाळेतील प्रकार : शाळा समितीने केला पंचनामा
एटापल्ली : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येमली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी समितीची स्थापना झाल्यापासून शाळा व्यवस्थापन समितीची आजवर एकही सभा घेतली नाही. सदर शाळा मुख्याध्यापकांकडून अनागोंदी कारभार सुरू असून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी मंगळवारी थेट येमली शाळेला भेट देऊनया शाळेच्या व्यवस्थापनाचा पंचनामा केला. दरम्यान शाळेत उपलब्ध असलेले जुने तांदूळ, मूगडाळ, तूरडाळ, वटाणे, मिरची व हळद पावडर पूर्णत: खराब झाल्याचे निदर्शनास आले. या शाळेत सदर साहित्याचा वापर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शालेय आहारात केला जात असल्याची धक्कादायक प्रकार पुढे आला.
जुन्या साठ्यातील धान्याचा व साहित्याचा विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी येथे वापर केला जात असून खराब झालेले अनेक साहित्य पोषण आहारात खुलेआम वापरले जात असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना भेटीदरम्यान दिसून आले.
भेटीप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सी. जे. आळे व इतर शिक्षक उपस्थित होते. मात्र शिक्षक मार्गीया हे दोन दिवसाच्या रजेवर असल्याचे निदर्शनास आले. सदर शाळेच्या मुख्याध्यापकांकडून अनागोंदी कारभार सुरू असून शाळा व्यवस्थापन समितीची आजवर एकही सभा घेण्यात न आल्याने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी एटापल्लीचे संवर्ग विकास अधिकारी ए. एम. इल्लुरकर यांच्याकडे केली आहे. या संदर्भात थेट एटापल्ली गाठून या सदस्यांनी बीडीओला मंगळवारी लेखी निवेदन दिले. बुर्गीच्या केंद्र प्रमुखांनी येमली शाळेला २८ सप्टेंबर रोजी भेट दिली असता, शाळा व्यवस्थापन समितीची सभा आजवर एकदाही घेण्यात आली नसल्याचे त्यांना दिसून आले. दर महिन्याला समितीची सभा घेण्यात यावी, अशी सूचना केंद्र प्रमुखांनी भेटीच्या रजिस्टरमध्ये नोंदविली आहे, असेही समितीच्या सदस्यांनी बीडीओंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शालेय कॅशबूक व पोषण आहाराची माहिती मागितली असता, सदर दोन्ही दस्तावेज आपण घरी नेले आहेत, असे मुख्याध्यापक आळे यांनी आम्हाला सांगितले. सदर कॅशबूक मी तुम्हाला दाखवू शकत नाही, असे सदस्यांना सांगितल्याचे निवेदनात म्हटले आहे. बीडीओंना निवेदन देताना समितीचे अध्यक्ष बाजीराव हिचामी, उपाध्यक्ष जगपती गावडे, सदस्य दौलत गावडे, यादव दुर्गे, सुधाकर दुर्गे, मंगेश पुंगाटी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)