झोपताना मच्छरदानी वापरा, मलेरियापासून दूर राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:17 AM2018-04-25T00:17:21+5:302018-04-25T00:17:21+5:30

मलेरिया रोगाचे सर्वाधिक रूग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळत असल्याने गडचिरोली जिल्हा मलेरियाबाबत अतिशय संवेदनशील समजल्या जातो. येथील वातावरण व भौगोलिक परिस्थिती मलेरियाच्या डासांसाठी अनुकूल असली तरी झोपताना मच्छरदानीचा वापर केल्यास......

Use mosquito nets while sleeping, stay away from malaria | झोपताना मच्छरदानी वापरा, मलेरियापासून दूर राहा

झोपताना मच्छरदानी वापरा, मलेरियापासून दूर राहा

Next
ठळक मुद्देजागतिक मलेरिया प्रतिबंधक दिन : गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे आढळतात सर्वाधिक रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मलेरिया रोगाचे सर्वाधिक रूग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळत असल्याने गडचिरोली जिल्हा मलेरियाबाबत अतिशय संवेदनशील समजल्या जातो. येथील वातावरण व भौगोलिक परिस्थिती मलेरियाच्या डासांसाठी अनुकूल असली तरी झोपताना मच्छरदानीचा वापर केल्यास मलेरिया रोगापासून दूर राहता येते, असा सल्ला जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी दिला आहे.
हिवतापाचा प्रसार अ‍ॅनोफिलीस डासांच्या मादीमार्फत होते. या डासांची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नदी, नाले, पाण्याच्या टाक्या, कालवे इत्यादीमध्ये हिवताप प्रसारक अ‍ॅनोफिलीस डासाची मादी अंडे देते. त्यामुळे डासांची पैदास वाढते. मलेरियाचा डास हिवताप रूग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. तेथे त्यांची वाढ होऊन डासांच्या लाडेवाटे चावल्यानंतर निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. निरोगी मनुष्याच्या शरीरात हे जंतू यकृतामध्ये जातात व त्यांची वाढ होऊन १० ते १२ दिवसांनी हिवतापाची लक्षणे दिसून येतात. दरवर्षी जगभरात सुमारे ३० ते ५० कोटी लोकांना हिवतापाची लागन होते. त्यापैकी सुमारे १० लाख लोक हिवतापाने मृत्यूमुखी पडतात. उष्ण व दमट हवामान आवश्यक असल्याने हिवताप हा प्रामुख्याने उष्णकटीबंधाच्या प्रदेशामध्ये आढळून येतो. हिवताप हा आजार कोणालाही होऊ शकतो. हिवताप ग्रस्त भागात राहणाºया लोकांमध्ये हा रोग अधिक प्रमाणात आढळून येते. तसेच हिवतापग्रस्त भागातून स्थलांतरीत हिवताप रूग्णांमुळे हिवतापाचा प्रादुर्भाव इतर भागातील लोकांना होतो. देशातील ओडीशा, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्टÑ आदी राज्यांमध्ये हिवतापाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून येतो. गरोदरपणातील हिवतापामुळे अपुरे दिवसाचे बाळ जन्माला येणे, गर्भपात होणे, जन्मजात मृत्यू असे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे या कालावधीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
मलेरिया प्रतिबंधक उपाययोजना
पाण्याच्या टाक्यात डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून त्या दुरूस्त कराव्यात. त्यास झाकण बसवावे. दैनंदिन वापराच्या पाण्याकरिता घरामधील तसेच घराबाहेरील पिंप आठवड्यातून दोनदा रिकामे करून ते पूर्णपणे वाळवावे व त्यानंतर पाणी भरावे. डासांचा उपद्रव टाळण्यासाठी पाण्याच्या सर्व टाक्या व पाण्याचे साठे डासप्रतिबंधक स्थितीत व्यवस्थित झाकून ठेवावे. इमारतीच्या गच्चीवर किंवा परिसरात अनावश्यक पाणी साचू देऊ नये. झोपताना हातपाय झाकले जातील अशा पायघोळ कपड्यांचा वापर करावा. डास प्रतिबंधक क्रीम वापरावे. झोपताना मच्छरदानीचा वापर करणे हा सर्वाधिक चांगला उपाय आहे.
हिवतापाची लक्षणे
थंडी वाजून ताप येणे, एक दिवसाआड ताप येणे, ताप आल्यानंतर घाम येऊन अंग गार पडते, डोके दुखणे, उलट्या होणे आदी लक्षणे दिसून येतात.
हिवतापदूषित डासांनी चावल्यानंतर १० दिवस ते चार आठवड्यात हिवतापाची चिन्हे दिसून येतात. संसर्गानंतर लवकरात लवकर सात दिवस व उशिरा एक वर्षापर्यंत हिवतापाची लक्षणे आढळतात. काही जंतू आपल्या यकृतामध्ये सुप्तावस्थेत लपून राहू शकतात. पोषक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लाल रक्तपेशींवर हल्ला करून रोगाची पुन्हा लागण होते.

Web Title: Use mosquito nets while sleeping, stay away from malaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.