मासेमारीसाठी नवीन तंत्र वापरा
By admin | Published: October 30, 2015 01:36 AM2015-10-30T01:36:03+5:302015-10-30T01:36:03+5:30
गडचिरोली जिल्ह्यात तलाव, बोडी, नदी, नाले यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर पर्जन्यमानाचेही प्रमाण अधिक असल्याने मासेमारी व्यवसायास मोठा वाव आहे.
विभागीय आयुक्तांचा सल्ला : मासेमारी प्रकल्पाची केली पाहणी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात तलाव, बोडी, नदी, नाले यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर पर्जन्यमानाचेही प्रमाण अधिक असल्याने मासेमारी व्यवसायास मोठा वाव आहे. मासेमारीसाठी महिला बचतगटांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा सल्ला विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिला.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या एमआयडीसीमधील कार्यालयाच्या परिसरातील मासेमारी प्रकल्पाची बुधवारी पाहणी केली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, माविमच्या जिल्हा समन्वयक कांता मिश्रा, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सर्चचे डॉ. अनंत बंग आदी उपस्थित होते.
मासेमारी (केज) प्रकल्पाची सुरुवात जिल्ह्यात महिला गटांनी केली आहे. यासाठी तयार करण्यात येणाऱ्या लोखंडी सापळ्यांचा खर्च खूप मोठा आहे. त्यामुळे फायबरसारख्या कमी किंमतीच्या सापळ्यांची उपलब्धतता झाल्यास अधिकाधिक जणांना हा व्यवसाय सुरू करता येईल. खर्च कमी येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देशसुद्धा विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले. (नगर प्रतिनिधी)