निर्माल्याचा सेंद्रिय खत म्हणून वापर
By admin | Published: September 11, 2016 01:35 AM2016-09-11T01:35:53+5:302016-09-11T01:35:53+5:30
गणेश उत्सवात पूजापाठ करताना फुले, बेलपत्र व अन्य साहित्य तसेच पदार्थांचा वापर केला जातो.
अंनिसकडून संकलन : पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुढाकार
गडचिरोली : गणेश उत्सवात पूजापाठ करताना फुले, बेलपत्र व अन्य साहित्य तसेच पदार्थांचा वापर केला जातो. त्यानंतर साहित्य तसेच इतरत्र फेकून दिले जाते. त्यामुळे प्रदूषण होते. ही बाब टाळण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने स्थानिक राणी दुर्गावती कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींमार्फत निर्माल्य संकलन केले जात आहे. निर्माल्य परसबागेत झाडांजवळ टाकून सेंद्रिय खत म्हणून त्याचा वापर केला जात आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राणी दुर्गावती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने येथील प्रा. देवानंद कामडी तसेच अनेक नागरिकांच्या घरी भेट देऊन निर्माल्य गोळा करण्यात आले. त्यानंतर निर्माल्य हरित सेनेच्या सुपूर्द करण्यात आले. निर्माल्य परसबागेतील वृक्षांना सेंद्रिय खताच्या रूपाने अर्पण केले जात असून गणेश विसर्जन पर्यावरणपूरक करण्याा अंनिसचा हेतू आहे. निर्माल्य संकलनाच्या वेळी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, उपाध्यक्ष सिंधू चहांदे, शहर कार्याध्यक्ष राजेश चुऱ्हे, प्रधान सचिव पुरूषोत्तम ठाकरे, प्रा. देवानंद कामडी, सूचिता कामडी व हरित सेनेच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
तसेच पुरूषोत्तम ठाकरे, दादाजी मेश्राम यांनी हरित सेनेच्या विद्यार्थिनींना गणपती मूर्तीजवळील निर्माल्य सुपूर्द केला. त्यानंतर निर्माल्य परसबागेतील फुलझाडांजवळ टाकून सेंद्रिय खताच्या रूपाने अर्पण करण्यात आला. यावेळी विलास निंबोरकर, पुरूषोत्तम ठाकरे, राजेश चुऱ्हे, दादाजी मेश्राम, अनिता ठाकरे, सुषमा मेश्राम व हरित सेनेच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. अंनिसच्या या उपक्रमाबद्दल ज्येष्ठ सल्लागार डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. मुरलीधर बद्दलवार, पंडित पुडके, उद्धव डांगे, पुरूषोत्तम चौधरी, संध्या येलेकर, सुनीता उरकुडे, स्मिता लडके, गजानन राऊत यांनी कौतुक केले आहे.