पंपांचा वापर सर्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:38 AM2021-05-21T04:38:41+5:302021-05-21T04:38:41+5:30
गडचिरोली : नगरपालिकेने दिवसातून दोनदा नळ पाणीपुरवठा नियमित केला जातो. मात्र गडचिरोली शहरात काही नागरिक आपल्या घरच्या नळाला टिल्लू ...
गडचिरोली : नगरपालिकेने दिवसातून दोनदा नळ पाणीपुरवठा नियमित केला जातो. मात्र गडचिरोली शहरात काही नागरिक आपल्या घरच्या नळाला टिल्लू पंप लावत असल्याने इतर नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळते.
चपराळा पर्यटनस्थळी सुविधांचा अभाव
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र प्रशांतधाम, चपराळा येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मात्र याठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
इमारतीलगतच्या रोहित्रांचा धोका वाढला
गडचिरोली : ग्रामीण तसेच शहरातील बहुतांश शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प थंडबस्त्यात
अहेरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात.
बाजारात ओटे बनवा
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी हे परिसरातील मोठे गाव असून, येथे दर शुक्रवारला आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेकडो नागरिक वस्तूच्या खरेदी-विक्रीसाठी बाजारात येतात. मात्र या बाजारात ओट्याची व्यवस्था नसल्याने विक्रेत्यांसह ग्राहकांना त्रास होत आहे. त्यामुळे ओटे बांधावेत.
डेपोअभावी नागरिक त्रस्त
कुरखेडा : अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावांत निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र कुरखेडा येथे निस्तार डेपो नाही.
विहिरीवर खासगी पंप
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणीपंप लावण्यात आले आहेत. मात्र याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाहीत. ग्रामपंचायतीने स्वत: दखल घेऊन अशाप्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष द्यावे.
कव्हरेजची समस्या
गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम परिसरात माेबाइल टाॅवर नसल्याने कव्हरेजची समस्या आहे. लाेकांकडे असलेले ॲन्ड्राॅइड माेबाइल इंटरनेटवरील कामाशिवाय कुचकामी ठरत आहे. त्यामुळे गुड्डीगुडम येथे टाॅवरची निर्मिती करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे.
एटापल्लीत अतिक्रमण
एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढावे, अशी मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष आहे.
मुख्यालय सक्तीचे करा
धानोरा : धानोरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहतच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत. अनेक कामे खाेळंबतात.
माेहझरीत रस्ते खड्डेमय
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. हे रस्ते दुरुस्त करावेत त्याचबरोबर नाल्या साफ कराव्या, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
फवारणीची मागणी
गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. गांधी वॉर्डात दाट लोकवस्ती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाल्या आहेत.
अट शिथिल करा
गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत.
वास्तूची दुरुस्ती करा
सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक वर्षांपासून मागणी हाेत आहे.
याेजनांची जागृती करा
आलापल्ली : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे. दुर्गम भागात अनेक लाेकांना याेजनांची मुळीच माहिती मिळत नसल्याचे दिसून येते.
दत्तमंदिरात सुविधा द्या
आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे प्राचीन काळापासून दत्ताचे मंदिर आहे. मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे, परंतु मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असून, मंदिर परिसरात सोईसुविधा देण्याची मागणी होत आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे.