सद्गुणांचा उपयोग करून प्रत्येक नर्सेसने समाजहित जोपासावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2017 12:54 AM2017-01-10T00:54:02+5:302017-01-10T00:54:02+5:30
डॉक्टर व नर्सेस असल्यामुळे आजारपणात रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.
योगीता पिपरे यांचे आवाहन : चातगाव येथे साळवे नर्सिंग कॉलेजच्या स्नेहसंमेलनाचा शुभारंभ थाटात
गडचिरोली : डॉक्टर व नर्सेस असल्यामुळे आजारपणात रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. प्रत्येक नर्सेसने आपल्यातील सद्गुणांचा उपयोग करून समाजहित जोपासावे, असे प्रतिपादन गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.
डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज चातगाव यांच्या स्टुडंट नर्सेस असोसिएशनतर्फे सोमवारी आयोजित ओपन टॅलेंट कॉन्टेस्ट व स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश सदस्य प्रमोद पिपरे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे, सचिव डॉ. अमित साळवे, अविनाश भांडेकर, प्रा. अनिल धामोडे, अरविंद खोब्रागडे, जयंत निमगडे, कोषाध्यक्ष डॉ. अमित रामने, प्राचार्य दिप्ती तादूरी, उपप्राचार्य समक्का पाष्टम, ट्युटर सुषमा गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी योगिता पिपरे यांनी डॉ. साळवे नर्सिंग महाविद्यालयाच्या यशस्वी भरारीचे कौतुक करून येथील प्रशिक्षीत झालेल्या नर्सेसनी रुग्णांची सेवा योग्य रितीने करून समाजापुढे आदर्श निर्माण करावा, असे आवाहन केले. पृथ्वी भ्रमणाप्रमाणे नर्सेसची रुग्णसेवा ही अविरत सुरू असते. प्रत्येक व्यक्ती हा पृथ्वीवर जन्माला येताना काहीतरी गुण घेऊन येतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी प्रमोद पिपरे म्हणाले, आदिवासी दुर्गम भागात सदर संस्थेने नर्सिंग कॉलेज सुरू केल्याने देशात जिल्ह्याचे नाव झाले. त्याचप्रमाणे त्यांनी विद्यार्थिनींना सेवेची संधी देऊन स्वयंप्रेरणेने समाजसेवेचे दालन सुरू केले आहे. कठिण परिस्थितीत काम करून आरोग्य सेवेचा विळा संस्थाध्यक्षांनी उचलला असल्याने विद्यार्थिनींनी संधीचे सोने करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अरविंद खोब्रागडे यांनी विद्यार्थिनींच्या सुप्तगुणांना वाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रा. अनिल धामोडे यांनी परिस्थितीला सामोरे जावून धैर्य दाखविल्यास यश मिळते. हे पटवून दिले. जयंत निमगडे यांनी रुग्णसेवा ही समाजसेवा असल्याचे विशद केले. अविनाश भांडेकर यांनी या संस्थेने वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्या, अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. प्रमोद साळवे यांनी संस्थेच्या सन २००५ पासूनच्या वाटचालीचा इतिहास विशद केला. डॉ. अमित साळवे यांनी नर्सेस क्षेत्रातील विविध संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष वैशाली फुलसंगे, कार्याध्यक्ष श्रीदेवी बारसागडे, उपाध्यक्ष ऐश्वर्या कोरेवार, सचिव निलिमा अंबादे, सहसचिव सुष्मिता रॉय, कोषाध्यक्ष प्राजक्ता भांडेकर, सदस्य रेशमा चिर्पोली, त्र्यंबकेश्वरी कोडापे यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)