रोहयो कामावर ट्रॅक्टरचा सर्रास वापर
By admin | Published: May 24, 2016 01:29 AM2016-05-24T01:29:56+5:302016-05-24T01:29:56+5:30
नोंदणीकृत प्रत्येक मजुरांना १०० दिवस रोजगार देण्याची हमी शासनाकडून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दिली जाते.
योजनेचे स्वरूप बदलले : मजुरांचा रोजगार हिरावला; फरी येथील प्रकार
मोहटोला (किन्हाळा) : नोंदणीकृत प्रत्येक मजुरांना १०० दिवस रोजगार देण्याची हमी शासनाकडून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दिली जाते. मात्र या योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामात ट्रॅक्टरचा सर्रास वापर होत असल्याने मजुरांचा रोजगार हिरावला आहे. सदर प्रकार शिवराजपूर गट ग्रामपंचायतींतर्गत फरी येथील मामा तलाव खोलीकरणाच्या कामात दिसून येत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेवरील कामांसाठी सरकार दरवर्षी अंदाजपत्रकात कोट्यवधी रूपयांच्या निधीची तरतूद करते. शिवाय प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसांचा रोजगार देण्याची कायद्यात तरतूद आहे. १०० दिवस पुरेल, एवढ्या रोजगाराचे नियोजनही नरेगा विभागाच्या वतीने केल्या जाते. मात्र ट्रॅक्टरचा वापर होत असल्याने मजुरांचा रोजगार हिरावला जात असल्याचे दिसून येत आहे.
शिवराजपूर गट ग्रामपंचायती अंतर्गत फरी येथे मामा तलावाच्या खोलीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या कामावर एकूण २१५ मजूर कार्यरत असून १२ ते १३ ट्रॅक्टरचा देखील या कामावर वापर केला जात आहे. मजुरांचे पायदळ चालणे अधिक होऊ नये तसेच तलावाच्या पाळीवर चढताना मजुरांना अधिक त्रास होऊ नये, यासाठी तलाव खोलीकरणाची माहिती मजुरांकरवी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून सदर माती इतरत्र फेकली जात असल्याचे संबंधित ग्रामरोजगार सेवकाने सांगितले. जी चलाई ट्रॅक्टरला दिली जाते. तीच चलाई मजुरांना देण्यात आली तर तलावाची पाळ रूंदावेल व मजबूतही होईल. यातून मजुरांना अधिक दिवस काम मिळू शकेल. मात्र संबंधित यंत्रणेने असे काहीही न करता मामा तलाव खोलीकरणाच्या कामात ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. (वार्ताहर)