रिक्त पदांमुळे पर्यवेक्षीय यंत्रणा खिळखिळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:32 AM2021-01-21T04:32:52+5:302021-01-21T04:32:52+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बाराही तालुक्यात मिळून जवळपास १५५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजार शिक्षक कार्यरत ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बाराही तालुक्यात मिळून जवळपास १५५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजार शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हास्तरावर जि.प.मध्ये शिक्षण विभाग असून या विभागामार्फत तालुक्यावर नियंत्रण ठेवले जाते. मात्र ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागातील शाळा, तेथील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी गुणवत्ता यासह विविध शैक्षणिक बाबींवर तालुक्याची पर्यवेक्षीय यंत्रणा नियंत्रण ठेवत असते. सदर पर्यवेक्षीय यंत्रणेमध्ये गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख आदींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे अहेरी उपविभागात गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांची अधिकाधिक पदे रिक्त असल्याने या भागातील जि.प.प्राथमिक शाळांच्या दर्जा व गुणवत्तेवर परिणाम होत आहे. गडचिरोली, धानोरा, भामरागड या तीनच पंचायत समितीस्तरावर नियमित गटशिक्षणाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. इतर नऊ तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. विशेष करून अहेरी उपविभाग व उत्तर भागातील कोरची, कुरखेडा येथील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. गटशिक्षणाधिकारी पदाचा अनुशेष कायम आहे.
बाॅक्स ...
केंद्रप्रमुखांची ४५ पदे रिक्त
बाराही पंचायत समिती मिळून जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची एकूण १०१ पदे मंजूर आहेत. यापैकी ५६ पदे भरण्यात आली असून ४५ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये सर्वाधिक अहेरी व सिरोंचा तालुक्यातील पदांचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यात आष्टी, गणपूर, गडचिरोली तालुक्यात मुरखळा, येवली, आंबेशिवणी, आरमोरी तालुक्यात डोंगरगाव, मोहझरी, आरमोरी, मुलचेरा तालुक्यात गांधीनगर, मुलचेरा, सुंदरनगर, कुरखेडा तालुक्यात कढोली, कोरची तालुक्यात देऊळभट्टी, बेतकाठी व कोरची तसेच धानोरा तालुक्यात येरकड, दुर्गापूर, मुरूमगाव, पेंढरी, एटापल्ली तालुक्यात गट्टा, कसनसूर, गेदा, कोटमी, एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात लाहेरी, मन्नेराजाराम, भामरागड व नारगुंडा आदी ठिकाणची केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत.
बाॅक्स ......
दुर्गम भागात कर्मचाऱ्यांची शाळेला दांडी
अहेरी तालुक्यात अहेरी, देवलमरी, आलापल्ली, राजाराम, उमानूर, जिमलगट्टा, देचलीपेठा, पेरमिली, दामरंचा आदी नऊ ठिकाणची केंद्रप्रमुखांची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. तसेच सिरोंचा तालुक्यात सिरोंचा, आरडा, झिंगानूर, रंगय्यापल्ली, रेगुंठा, टेकडाताला, आसरअल्ली व नदीकुडा आदी आठ ठिकाणची केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. स्वतंत्र केंद्रप्रमुख नसल्याने दुर्गम भागातील शाळांमधील सुविधा, तेथील गुणवत्ता व विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पर्यवेक्षीय यंत्रणा या उपविभागात पांगळी असल्याने दुर्गम भागातील शाळा रामभरोसे आहेत. परिणामी अहेरी उपविभागातील अनेक शाळांचे शिक्षक आठवड्यातून एक ते दोन दिवस शाळेला दांडी मारतात. मात्र तपासणीच्या अहवालात सर्व व्यवस्थित दाखविले जाते.