रिक्त पदांमुळे पशुवैद्यकीय सेवा काेलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:35 AM2021-04-11T04:35:54+5:302021-04-11T04:35:54+5:30
चामोर्शी : जिल्हा परिषद गडचिरोली पशुसंवर्धन विभागामार्फत पंचायत समिती चामोर्शी येथील पशुसंवर्धन विभागांतर्गत तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवेतील अनेक पदे ...
चामोर्शी : जिल्हा परिषद गडचिरोली पशुसंवर्धन विभागामार्फत पंचायत समिती चामोर्शी येथील पशुसंवर्धन विभागांतर्गत तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवेतील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जनावरांवर वेळीच याेग्य उपचार हाेत नसल्याने ही सेवा काेलमडली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील पशुवैद्यकीय विभागातील रिक्त पदे न भरल्यास जनावरांवर उपचारात प्रचंड हेळसांड हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चामाेर्शी तालुक्यात प्रथम श्रेणीचे १९ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. श्रेणी-२ चे ५ पशुवैद्यकीय दवाखाने तर आष्टी येथे एक फिरते पशुचिकित्सालय आहे. पंचायत समिती कार्यालयात पशुधन विकास अधिकारी (विस्तार) एक पद मंजूर आहे व सदर पद भरलेले आहे. तालुक्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची १४ पदे मंजूर आहेत. यापैकी दोन पदे भरली आहेत. परंतु त्यांचे स्थानांतरण झाल्याची माहिती आहे. सध्या एकूण १२ पदे रिक्त आहेत तर सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर असून सर्व पदे भरलेली आहेत. पशुधन पर्यवेक्षकाची १२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी गिलगाव व भाडभिडी येथील दोन पदे रिक्त आहेत. पशुपट्टीबंधकाची सहा पदे पूर्ण भरली आहेत. परिचराची २३ पदे मंजूर असून १८ पदे भरली आहेत. त्यापैकी ५ पदे रिक्त आहेत. यामध्ये वायगाव, जामगिरी, गिलगाव, तुंबडी, आमगाव व पंचायत समिती पशुधन कार्यालयातील एका पदाचा समावेश आहे. श्रेणी-१ मध्ये पशुवैद्यकीय दवाखाना चौडमपल्ली, आष्टी, कोनसरी, मुधोली, अड्याळ, जामगिरी, वायगाव, तुमडी, घोट, भाडभिडी बी., रेगडी, मुरमुरी, गिलगाव, कुनघाडा रै. तर श्रेणी-२ मध्ये भेंडाळा, मुरखळा, लखमापूर बोरी, आमगाव, चापलवाडा आदी गावांचा समावेश आहे.
बाॅक्स
दाेन दवाखाने भाड्याच्या खाेलीत
चामाेर्शी तालुक्यातील मुधोली, तुंबडी ही दोन पशु दवाखाने भाड्याच्या खाेलीत आहेत तर जामगिरी, चौडमपल्ली, गिलगाव (ज.) येथील दवाखाने ग्रामपंचायतच्या इमारतीत आहेत. तसेच तालुक्यातील १४ पशुवैद्यकीय दवाखाने शासकीय इमारतीत आहेत. पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने पशुवैद्यकीय यंत्रणा कोलमडली आहे. इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त असल्याने पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) हे कार्यालयातील काम सांभाळून पशुवैद्यकीय दवाखाने सांभाळत आहेत. त्यामुळे रिक्त असलेली पदे लवकर भरावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.