रिक्त पदांमुळे सागवानाचे संरक्षण धाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:30+5:302021-02-14T04:34:30+5:30
काैसर खान सिराेंचा : सिरोंचा तालुक्यात उत्तम व उच्च दर्जाचे सागवान उपलब्ध आहे. या सागवानी लाकडाला संपूर्ण राज्यातच नव्हे, ...
काैसर खान
सिराेंचा : सिरोंचा तालुक्यात उत्तम व उच्च दर्जाचे सागवान उपलब्ध आहे. या सागवानी लाकडाला संपूर्ण राज्यातच नव्हे, तर परराज्यांत मोठी मागणी आहे. जंगलात उच्च दर्जाचे सागवान प्राप्त होत असल्यामुळे अवैधरीत्या सागवानाच्या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लाकडाच्या तस्करीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
अहेरी उपविभागात माेठ्या प्रमाणात उच्च प्रतीचे सागवान उपलब्ध आहे. सिरोंचा तालुक्यातही उत्तम प्रतीचे सागवान आढळते. मात्र, शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त करून देणाऱ्या सिरोंचा वनविभागात वन कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने मौल्यवान सागवानाच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. सागवानाची तस्करी तसेच नक्षल्यांकडून होणारी जाळपोळ रोखण्यात वनविभागाला अपयश आले आहे. एकीकडे मैल्यवान सागवानाची तस्करी सुरू असताना बिटामध्ये पडून राहत असलेल्या सागवानाच्या सुरक्षेसंबंधी कोणतीच खबरदारी वनविभागाद्वारे घेतली जात नाही. सिरोंचा परिक्षेत्रांतर्गत बामणी वन परिक्षेत्रातील रोमपल्ली बिटात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सागवान बिटाच्या संरक्षणार्थ वनविभागाने कोणत्याही प्रकारची उपाययाेजना केली नाही. रोमपल्ली वनविभागाच्या कार्यालय परिसरातच जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उपपोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. लिलाव डेपोसमोरच पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्याने या सागवान बिटाला एकप्रकारे संरक्षण प्राप्त झाले होते. मात्र, काही वर्षांतच येथील उपपोलीस ठाणे बामणी येथे हलविण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा सागवान डेपोच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. या ठिकाणी वनविभागाच्या वतीने सुरक्षा चाैकीदाराची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, २७ फेब्रुवारी रोजी नक्षल्यांच्या भारत बंद दरम्यान नक्षल्यांनी या वन डेपोस आग लावली. यात वनविभागाचे अंदाजे ६० ते ७० लाखांचे नुकसान झाले होते. माैल्यवान सागवान अशाप्रकारे नष्ट होत असताना मात्र स्थानिक वनविभागाकडून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे. वनविभागाच्या नियोजनाअभावी या वनडेपोची नक्षल्यांकडून जाळपोळ किंवा वनतस्करांकडुन लाकडांची चाेरी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. हीच स्थिती तालुक्यातील अनेक बिटांमध्ये आहे. तेथेही सागवानाच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना झाल्याचे दिसून येत नाही.
बाॅक्स
लिलावातील माल जाताे परराज्यात
रोमपल्ली बिटात वनतस्करांकडून जप्त करून विक्री आगार डेपोमध्ये सागवान ठेवले जाते. या बिटातील माैल्यवान सागवान लिलावाच्या माध्यमातून विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बोली लावण्यासाठी परराज्यातील कंत्राटदार दाखल होतात. लिलावात माेठी बाेली बाेलून येथील सागवान तेलंगणा व आंध्र प्रदेशात नेले जाते. येथील सागवानी लाकडाला मोठ्या प्रमाणात मागणी असताना या बिटातील सागवानाच्या सुरक्षिततेकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे शासनाचा काेट्यवधींचा महसूल बुडत आहे.
बाॅक्स
राेमपल्लीतील कर्मचारी निवासस्थाने ओस
वनविभागाच्या वतीने १९८० च्या दशकात रोमपल्ली बिटामध्ये वन कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाचे बांधकाम करण्यात आले होते. सुरुवातीचे काही महिने या निवासस्थानात वन कर्मचाऱ्यांचे वास्तव्य हाेते. मात्र, त्यानंतर संबंधित विभागाने या निवासस्थानांकडे दुर्लक्ष केल्याने ही निवासस्थाने आता ओस पडली आहेत.