आदिवासी विकास महामंडळात पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:41+5:302021-02-14T04:34:41+5:30
सेवा केंद्रांअभावी नागरिकांची पायपीट गडचिरोली : अहेरी तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे लोकांना निर्माण करण्यात आलेले महाईसेवा केंद्र ...
सेवा केंद्रांअभावी नागरिकांची पायपीट
गडचिरोली : अहेरी तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे लोकांना निर्माण करण्यात आलेले महाईसेवा केंद्र गाठण्यासाठी ६० ते ७० किमीचे अंतर कापावे लागते. यात नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे महा ई सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्त्यावर आलेली झाडे तोडण्याची मागणी
आरमोरी : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या मार्गावर अनेक झाडे रस्त्यावर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येते. वन विभागाने या झाडांची तोड करावी, अशी मागणी आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष आहे.
निवासस्थान इमारत धोकादायक
अहेरी : येथील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना राहण्याकरिता २५ वर्षांपूर्वी निवासस्थानांसाठी इमारत बांधण्यात आली. मात्र, देखभाल व दुरुस्तीअभावी तसेच निकृष्ट बांधकामामुळे ही इमारत जीर्ण झाली आहे.
पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच द्या
गडचिरोली : जिल्ह्यात बऱ्याच जनावरांना विविध आजाराने ग्रासले आहे. येथील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी गावात फिरून पशुवैद्यकीय सेवा देत आहेत. त्यामुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू करावे, अशी मागणी होत आहे.
वाढीव वस्तीत अपुरा पाणीपुरवठा
गडचिरोली : नगर पालिकेच्या वतीने नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी शहराच्या गोकुलनगरलगतची वाढीव वस्ती, माता मंदिर मागील व सभोवतालच्या परिसरात केवळ २० ते २५ मिनिटे नळाला पाणी येत असून, या भागात एकदाच सायंकाळी नळाला पाणी सोडले जाते. स्नेहनगर स्टेडियम परिसरात दिवसातून एकदा सकाळी १५ ते २० मिनिटे नळाला पाणी येते. बहुतांश कुटुंबांकडून पाणी साठवणुकीचे साधन नसल्याने त्यांची मोठी पंचाईत होते.
रस्त्यालगतच्या उभ्या वाहनाकडे दुर्लक्ष
गडचिरोली : गडचिरोली शहरातून जाणार्या चामोर्शी, धानोरा, आरमोरी व चंद्रपूर या चारही मार्गांलगत ट्रक व मोठी चारचाकी वाहने तासन् तास उभी केली जातात. काही वाहने रात्री व दिवसा उभी असतात. या वाहनांमुळे पायदळ जाणारे नागरिक तसेच दुचाकीस्वारांना त्रास होत असतो. एकावेळी दोन वाहने आल्यास वाहन वळविताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक पोलिसांनी उभ्या असणार्या वाहनावर कठोर कारवाईची मागणी आहे.
पुलावरील संरक्षक कठडे गायब
वैरागड : आरमोरी तालुक्याच्या वैरागड-करपडाच्या मधोमध वाहणाऱ्या खोब्रागडी नदी पुलावर लोखंडी संरक्षक कठडे लावण्यात आले होते; परंतु दोन वर्षांतच येथील कठडे अज्ञात लोकांनी लांबविल्याने पूल संरक्षक कठड्यांशिवाय जैसे थे झाला आहे. या मार्गावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे पुलावरून नदीपात्रात कोसळून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
शेतीसाठी झुडपी जंगल उपलब्ध करण्याची मागणी
गडचिरोली : काही तालुक्यांमध्ये झुडपी जंगल आहे. हे जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही. शेती हा तोट्याचा व्यवसाय ठरत चालला आहे. त्यामुळे झुडपी जंगल शेतीसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे.
कुंभी गावाजवळ उंच पुलाचे बांधकाम करा
गडचिरोली : तालुका मुख्यालयापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या कुंभी गावाजवळील पोटफोडी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. येथे उंच पुलाचे बांधकाम केल्यास पावसाळ्यातील समस्या सुटू शकते. त्यासाठी प्रशासनाने निर्णय घेण्याची गरज आहे.
पक्क्या रस्त्याअभावी ४० किमींची पायपीट
लाहेरी : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या विनागुंडा परिसरात पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना चिखल तुडवत विविध वस्तू खरेदी करण्यासाठी व उपचारासाठी लाहेरी येथे यावे लागते. पक्का रस्ता नसल्याने अनेक नागरिक ३५ ते ४० किमी पायी चालत येतात. ही स्थिती अद्यापही कायम आहे.
राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा उघडण्याची मागणी
भेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा हे गाव मध्यवर्ती ठिकाण आहे. या गावात जिल्हा सहकारी बँकेची शाखा आहे; परंतु येथे नेहमीच गर्दी असते. त्यामुळे १० ते १२ किमी अंतरावरून आलेल्या ग्राहकांना कामाशिवाय परत जावे लागते. त्यामुळे येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा उघडावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
ब्लड बँकेअभावी रुग्णांची अडचण
सिरोंचा : जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे दोन रक्तपेढ्या आहेत. याशिवाय अन्य ठिकाणी रक्तपेढ्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे रक्ताची गरज भासलेल्या रुग्णाला दोन ठिकाणी भरती करावे लागते. याचा फटका दुर्गम भागातील रुग्णांना बसतो. त्यामुळे सिरोंचा तालुक्यासाठी सिरोंचा येथे रक्तपेढी उपलब्ध करावी.
विहिरीचे अनुदान प्रलंबित
वैरागड : शासनाच्या धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत आरमोरी व कुरखेडा तालुक्यांत अनेक शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीचे काम पूर्ण केले. मात्र, संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम अद्यापही मिळाली नाही.