रिक्त पदाने प्रशासकीय यंत्रणेचा डोलारा कोसळला
By admin | Published: October 2, 2016 02:10 AM2016-10-02T02:10:21+5:302016-10-02T02:10:21+5:30
महत्त्वाचे असलेलेयेथील उपविभागीय अधिकारी पद मागील दोन वर्षांपासून रिक्त आहे. याशिवाय महसूल,
शासनाचे दुर्लक्ष : एटापल्ली तालुक्याचा विकास रखडला, नागरिकांच्या कामासाठी येरझारा
रवी रामगुंडेवार एटापल्ली
महत्त्वाचे असलेलेयेथील उपविभागीय अधिकारी पद मागील दोन वर्षांपासून रिक्त आहे. याशिवाय महसूल, आरोग्य, महावितरण, कृषी, पंचायत समिती शिक्षण यासह विविध विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. परिणामी एटापल्ली तालुक्याच्या प्रशासकीय यंत्रणेचा डोलारा पूर्णत: कोसळला आहे. दैनंदिन कामे होत नसल्याने नागरिक तालुका मुख्यालयाच्या कार्यालयात वारंवार येरझारा मारत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
येथील तहसील कार्यालयात तहसीलदारांची दोन पदे रिक्त आहेत. गोदाम किपर व शिपायाचे प्रतयेकी एक पद रिक्त आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची सात व आरोग्य सेवक (स्त्री, पुरूष) तीन असे एकूण १० पदे रिक्त आहेत. आरोग्य सेविकांची १५, परिचर ५ व समाई कामगाराचे एक असे एकूण ३८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील आरोग्यसेवक पूर्णत: अस्थिपंजर झाली आहे. बांधकाम विभागाच्या कार्यालयात शाखा अभियंत्याचे तीन, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक तीन, कनिष्ठ लिपीक दोन, वाहनचालक एक, शिपाई एक, चौकीदार दोन, केअरटेकर तीन, खानसामा एक अशी एकूण १६ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या येथील कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याचे एक, वरिष्ठ टेक्निकल दोन, फोनमॅन एक, टेक्निशयन तीन, ज्युनिअर टेक्निशयन दोन, युडीसी एक, अकाऊंट असिस्टन्ट एक अशी एकूण १० पदे रिक्त आहेत. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी, मुख्य सहायक, लेखापाल, दुरूस्ती लिपीक, नगर भूमापन लिपीक, प्रतीलीक, शिपाई अशी एकूण ८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांना वनहक्क पट्टे देण्याच्या कार्यवाहीत प्रचंड विलंब होत आहे. ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक एक, वैद्यकीय अधिकारी दोन, अधिपरिचारीका सात, क्ष-किरण तज्ज्ञ एक, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपीक, कक्ष सेवक अशी एकूण ११ पदे रिक्त आहे.
पंचायत समितीत अनेक पदे रिक्त
पंचायत समितीच्या पशुवसंवर्धन विभागांतर्गत पशुधन विकास अधिकारी सहा, पशुधन पर्यवेक्षक पशुधन पर्यवेक्षक, पट्टीबंधक एक, परिचर सहा अशी एकूण १४ पदे रिक्त आहेत. कृषी विभागात कृषी अधिकारी (विशेष घटक योजना), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, हातपंप यांत्रिकी, आरोग्य सेवक, वाहनचालक, परिचर प्रत्येकी एक असे एकूण सहा पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागांतर्गत तालुक्यातील शाळांमध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची तीन, पदवीधर शिक्षकांची ३७, सहायक शिक्षकांची ११ असे एकूण ५१ पदे रिक्त आहेत. आयटीआयमध्ये २६ पदे रिक्त आहेत.