रिक्त पदे, औषध तुटवड्यावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:39 AM2018-03-24T01:39:59+5:302018-03-24T01:39:59+5:30
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : इंडियन इंस्टिट्युट आॅफ युथ वेलफेअर संस्था गडचिरोलीच्या वतीने स्थानिक प्रेस क्लब भवनात १९ मार्च रोजी तालुकास्तरीय आरोग्य हक्क जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, औषधींचा तुटवडा, स्वच्छता व पाणी सुविधा आदीसह आरोग्य सेवेतील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य महासंघाचे उपाध्यक्ष खुशाल देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, शुभदा देशमुख, संतोष सावलकर, पत्रकार शेमदेव चापले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, तालुका आरोग्य अधिकारी सुनील मडावी, विस्तार अधिकारी कोटरंगे, प्रकल्प अधिकारी परांडे, डॉ. बोनगुलवार, पं.स. सभापती दुर्लभा बांबोळे, सदस्य जान्हवी भोयर, संस्थेचे समन्वयक मनोहर हेपट आदी उपस्थित होते.
अंगणवाडी केंद्रात वीज नाही. निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो. शौचालय व बाथरूममध्ये पाण्याची व्यवस्था नाही. या समस्या मार्गी लावून अंगणवाडी केंद्रांना गॅस उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी खुशाल देशमुख यांनी केली.
याप्रसंगी लोकप्रतिनिधी, शायकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयातील विविध समस्या मांडल्या. प्रास्ताविक मनोहर हेपट, संचालन हरिश्चंद्र खंडारे यांनी केले तर आभार भारत कुंभारे यांनी मनले. यावेळी ८० प्रतिनिधी उपस्थित होते.