माणसाचे लसीकरण लांबले अन् जनावरांसाठी लसची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:37 AM2021-05-18T04:37:48+5:302021-05-18T04:37:48+5:30
गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लसचा प्रत्येक जिल्ह्याला कमी प्रमाणात पुरवठा केला जात असल्याने हे लसीकरण लांबत चालले आहे. तर ...
गडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लसचा प्रत्येक जिल्ह्याला कमी प्रमाणात पुरवठा केला जात असल्याने हे लसीकरण लांबत चालले आहे. तर दुसरीकडे जनावरांना मान्सूनपूर्व दिल्या जाणाऱ्या लस उपलब्ध झाल्या नसल्याने त्यांचे लसीकरण थांबले आहे.
पावसाळ्यात जनावरांना प्रामुख्याने घटसर्प, एकटांग्या हे राेग हाेतात. यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता राहत असल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण केले जाते. यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून लस उपलब्ध करून दिल्या जातात. पावसाळा सुरू झाल्यानंतर जनावरे शेतीच्या कामात व्यस्त हाेतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच जनावरांचे लसीकरण हाेणे आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यंत पशुसंवर्धन विभागाकडून लस उपलब्ध झाल्या नसल्याने लसीकरणाची प्रक्रिया थांबली आहे. लवकरात लवकर लसची मागणी करून त्याचे वितरण प्रत्येक दवाखान्यापर्यंत करण्यात यावे. शक्य तेवढ्या लवकर लस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून हाेत आहे.
बाॅक्स....
काेणकाेणत्या दिल्या जातात लस
- गायवर्गीय प्राण्यांना एकटांग्याची लस दिली जाते.
- शेळी व मेंढ्यांना आंतरविषार (पीपीआर) ही लस दिली जाते.
- म्हशींना घटसर्प ही लस दिली जाते.
- तसेच प्रत्येक सहा महिन्याच्या अंतराने ताेंडखूर व पायखूर ही लस दिली जाते.
बाॅक्स....
जिल्ह्यातील जनावरांची संख्या
गायवर्गीय - ४,५९,४७१
म्हैस - ६६,२५९
शेळी - २,३९,५७८
मेंढ्या - १८,६०५
बाॅक्स...
५ लाख ४३ हजार लसची मागणी
जिल्ह्यातील पशुधन लक्षात घेता, जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाने राज्य पशुसंवर्धन विभागाकडे ५ लाख ४३ हजार लसची मागणी केली आहे. यामध्ये घटसर्प राेग प्रतिबंधात्मकच्या ४६,५०० लस, एकटांग्या ३९ हजार, एकटांग्या व घटसर्पची एकत्रित लस ६८ हजार ८००, पीपीआर ४५ हजार ५०० व ताेंडखूर व पायखुरीच्या ४ लाख १२ हजार १०० लसीचा समावेश आहे.
काेट....
पुढील आठ ते दहा दिवसात लस उपलब्ध हाेतील, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्याला लस उपलब्ध हाेताच त्याचे रुग्णालयस्तरावर वितरण केले जाईल. पावसाळ्यात जनावरांचे आराेग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या लस टाेचून घ्याव्यात. अगदी नाममात्र शुल्कात लस उपलब्ध करून दिल्या जातात.
- जी.बी.मेश्राम, पशुसंवर्धन उपायुक्त, गडचिराेली
काेट...
इंजेक्शन दिल्यानंतर एक ते दाेन दिवस बैलाला आराम करू द्यावा लागतो. सध्या शेतीची काेणतीही कामे नाहीत. त्यामुळे आता लस मिळाल्यास बैलाला आराम मिळेल. पाऊस पडल्यानंतर मात्र बैलांना आराम मिळत नाही. कधी कधी लस टाेचलेली जागा सुजते व बैलाला घरी ठेवावे लागते. त्यामुळे काही शेतकरी पावसळ्यात जनावरांना लस टाेचून घेत नाही.
- पुंडलिक चाैधरी, शेतकरी