वैरागड किल्ल्याची डागडुजी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:49 PM2018-11-12T22:49:44+5:302018-11-12T22:50:05+5:30
वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्याची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु हे काम आता थांबले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्याची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु हे काम आता थांबले आहे.
तत्कालीन चंद्रपूरच्या गोंड राजाने बल्लाळशाहाने वैरागड येथे किल्ला बांधला. पूर्वी या ठिकाणी हिऱ्यांची खाण होती. या खाणीच्या संरक्षणार्थ हा किल्ला बांधला. पुढे हिºयांची खाण बंद पडली. तेव्हापासून या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले. त्या काळातील वैभवशाली इतिहासाची साक्ष हा किल्ला अजूनही देत आहे.
काळाच्या ओघात किल्ल्याची पडझड सुरू झाली. याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे किल्ल्याचे तट, बुरूज उद्ध्वस्त झाले. झाडाझुडूपांनी किल्ल्याला वेढून घेतले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर मागील सहा वर्षांपासून वैरागड किल्ल्याची थोडीफार डागडुजी व सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र मागील पाच वर्षांपासून किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या दुरूस्तीपलीकडे काम जात नसल्याचा अनुभव आहे. या कामाचे आतापर्यंत पाच कंत्राटदार बदलण्यात आले आहेत. विद्यमान कंत्राटदार केवळ १० ते १२ मजूर कामावर ठेवून कासवगतीने काम करीत आहे. या कामात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोपसुद्धा स्थानिकांकडून होत आहे. किल्ला सौंदर्यीकरणाचे काम सध्या ठप्प पडले आहे. विद्यमान कंत्राटदाराला काम करण्याबाबत सक्त ताकीद देऊन त्याच्याकडून काम करून घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.