वैरागड ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार
By admin | Published: September 9, 2016 01:16 AM2016-09-09T01:16:35+5:302016-09-09T01:16:35+5:30
येथील ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच यांच्या संगणमताने ग्राम निधी,
सीईओंकडे तक्रार : गावकऱ्यांनी केली चौकशीची मागणी
वैरागड : येथील ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच यांच्या संगणमताने ग्राम निधी, १३ वा वित्त आयोग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, १४ वा वित्त आयोग, जिल्हा परिषद व पंचायत समिती निधी, मागास क्षेत्र अनुदान निधीमधून मंजूर झालेल्या विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असून मजुरांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून स्वत: रक्कमेची उचल केली असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
सन २०१६ मध्ये जून महिन्यात वार्ड क्रमांक ५ मधील कवडू बनकर यांच्या घराजवळील विहिरीचा गाळ उपसण्यात आला. प्रत्यक्षात पाच मजुरांना १ हजार ५०० रूपये मोबदला दिला असताना कामावर असलेल्या व्यक्तींच्या हजेरी पटावर त्यांची मजुरी सात हजार रूपये दाखविली आहे. मजुरांच्या खोट्या सह्या करून त्यांची मजुरी हडप करण्यात आली आहे. ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या एका मर्जीतल्या चपराशाने या सह्या मारल्या आहेत. मागील दीड वर्षात कामावर असलेल्या व्यक्तींच्या प्रत्येक हजेरी पटावर खोट्या सह्या मारल्या आहेत, असे निदर्शनास आले आहे.
मागास क्षेत्र विकास निधीतून अंगणवाडी विद्युतीकरणासाठी १ लाख २६ हजार २९४ रूपयांचा निधी खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. या ठिकाणी साहित्य खरेदीत अनेक खोटी बिले जोडण्यात आली आहेत. लाखो रूपयांचा खर्च दाखवून सुध्दा अंगणवाड्यांमधील विद्युतीकरण गायब झाले आहे. येथील सरपंच, उपसरपंच, ग्राम विकास अधिकारी, मासिक सभेच्या विषय सूचित विषय न ठेवता आपल्या मर्जीतल्या व्यक्तींसाठी ग्रामपंचायतचे ठराव घेतात, असा आरोप निवेदनातून केला आहे. ग्रामविकास अधिकारी सरपंच यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे ग्राम विकास मंत्री, जिल्हाधिकारी मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे केली आहे. सदर तक्रार पांडूरंग बावणकर, वसुधा तावेडे, राजू आकरे, महेंद्र तावेडे, सत्यदास आत्राम, रमेश पगाडे, सावजी धतकर, दिनकर लोते, रामभाऊ नंदरधने, प्रमोदे तावेडे, सुभाष बरडे, अमोल रामटेके, धम्मपती अलोणे, शेंद्रे यांनी केली आहे. (वार्ताहर)