वैरागड-मानापूर मार्गावर प्रशासनाचा खडा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:16 AM2017-07-19T01:16:23+5:302017-07-19T01:16:23+5:30
शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीच्या पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली.
लोकमतच्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग : मंगळवारी दुसऱ्यांदा मार्ग झाला बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीच्या पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. सकाळी शेतावर गेलेले मजूर पुलावरून पाणी वाहत असतानाच पूल ओलांडत होते. यावेळी त्यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता लोकमतने वर्तविली होती. याबाबतचे छायाचित्रही प्रकाशित केले होते. लोकमतच्या या वृत्ताची दखल घेऊन मंगळवारी या पुलावर प्रशासनाने खडा पहारा देत पुलावरून जाण्यास मनाई करीत होते.
वैरागडनजीक वैलोचना नदी आहे. वैरागड येथील अनेक शेतकऱ्यांचे शेत नदी पलिकडे आहेत. त्यामुळे नदी ओलांडून गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. शनिवारी शेतकरी व शेतमजूर सकाळी रोवणीच्या कामासाठी गेले होते. मात्र दुपारी वैलोचना नदीच्या पाण्याची पातळी वाढली व पुलावरून पाणी चढण्यास सुरूवात झाली. आणखी पाणी वाढण्याचा धोका असल्याने रोवण्यासाठी गेलेले मजूर ३ वाजताच परतले. मात्र त्यावेळी पुलावरून पाणी वाहत होते. प्रशासनाच्या वतीने कोणतीही उपाययोजना केली नव्हती. त्यामुळे महिला मजूर जीव धोक्यात घालून स्वत:च पूल ओलांडत होत्या. याबाबतचे छायाचित्र लोकमतने १६ जुलै रोजी रविवारी प्रकाशित केले.
मंगळवारीही रात्री जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे वैलोचना नदीच्या पाण्याची पातळी सकाळपासूनच वाढून दुपारी १२ वाजता पुलावरून पाणी चढले. याबाबतची माहिती आरमोरीचे तहसीलदार वाय. टी. धाईत यांना दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या. महसूल विभागाचे पथक पुलाजवळ पोहोचले. त्यांनी पुलावरून जाण्यास प्रतिबंध घातला. आकस्मिक स्थितीचा सामना करण्यासाठीही आपत्ती व्यवस्थापन विभागाने नियोजन केले होते. यावेळी मंडळ अधिकारी व्ही. डी. घरत, तलाठी डी. एल. कुबडे, पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर, कोतवाल बंडू कांबळे हे पुलाजवळ ठाण मांडून होते. सायंकाळी पुन्हा पाऊस झाल्याने रात्री उशीरापर्यंत वैलोचना नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती.