वैरागडात खुलेआम चालतो दारू, जुगार, कोंबडबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:56 PM2019-07-21T23:56:51+5:302019-07-21T23:59:11+5:30
आरमोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणारे वैरागड ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ठिकाणी पदवी व पद्व्युत्तर शिक्षणाची सुविधा आहे. मात्र गावात अवैध धंद्यांना उत आल्यामुळे वातावरण बिघडले आहे. वैरागड गावात दारू विक्री, जुगार व कोंबड बाजार आदी अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहे.
प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आरमोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणारे वैरागड ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ठिकाणी पदवी व पद्व्युत्तर शिक्षणाची सुविधा आहे. मात्र गावात अवैध धंद्यांना उत आल्यामुळे वातावरण बिघडले आहे. वैरागड गावात दारू विक्री, जुगार व कोंबड बाजार आदी अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खरीप हंगाम आटोपला की साधारणत: दसरा सणानंतर काही गावांमध्य कोंबड बाजार भरविले जातात. पण वैरागड व परिसरातील गावांमध्ये वर्षभर कोंबड बाजार भरविला जात असून यात हजारो रुपयांचा जुगार खेळला जात आहे. मागील काही दिवसांपासून वैरागड येथील आठवडी बाजाराच्या जागेवर कृषी गोदामाच्या मागे प्रत्येक रविवार व बुधवारी कोंबड बाजार भरवून जुगार खेळला जातो. या ठिकाणी वैरागड व परिसरातील कोंबड शौकीन एकत्र येऊन कोंबड बाजाराचे नियोजन करतात. यात सुशिक्षीत तरूणांचाही सहभाग मोठा असतो. वैरागड येथील अवैध दारू विक्रीची स्थिती विकोपाला गेली असून येथील मच्छीपालन सहकारी संस्थेच्या मागे असलेल्या वार्डातील टोकावरील आठ ते दहा ठिकाणी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. तसेच जुना बसस्थानक परिसर तसेच वैरागड-चामोर्शी-ठाणेगाव मार्गावरही दारू विक्री केली जाते. याशिवाय गाठे मोहल्यातही काही घरी अवैध व्यवसाय चालतो.
सध्या खरीपाचा हंगाम सुरू असल्याने मजुरांची नितांत गरज असते. मात्र अंग मेहनतीचे कामे सोडून अनेक युवक, वयोवृध्द नागरिक पानठेला व चायटपरीच्या आडोशाला बसून जुगार खेळत असतात. पोलिसांनी हे अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी होत आहे.
पाटणवाडा, मेंढेबोडीत तळीरामांची गर्दी
आरमोरी पंचायत समिती अंतर्गत वैरागड गट ग्रामपंचायतीच्या हद्दित येणाऱ्या पाटणवाडा, मेंढेबोडी या ठिकाणी दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दररोज सायंकाळच्या वेळी या दोन्ही गावात दारू मिळत असलेल्या ठिकाणी तळीरामांची गर्दी दिसून येते. वैरागड, पाटणवाडा, मेंढेबोडी या तीन गावात देशी, विदेशी मोहफूल दारू विक्रीस गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. अवैध दारू विक्रीमुळे या गावातील महिलांना त्रास होत आहे. दारूमुळे समाजिक सलोखा धोक्यात आला आहे. सातत्याने मागणी करूनही कारवाई शुन्य असल्याचे दिसून येते.