वैरागडात स्वच्छता अभियानाचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:49 AM2019-01-05T00:49:35+5:302019-01-05T00:50:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत वैरागड येथील ग्रामपंचायतीने सन २०१८-१९ या चालू वर्षात आतापर्यंत १० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत वैरागड येथील ग्रामपंचायतीने सन २०१८-१९ या चालू वर्षात आतापर्यंत १० महिन्यांत गटारे, रस्ते देखभालीच्या कामावर तीन लाख रूपयांचा खर्च केला आहे. मात्र गावाच्या सीमेलगतच्या दोन रस्त्यावर कचऱ्याचे प्रचंड साम्राज्य आहे. स्वच्छता अभियानाचा वैरागड गावात फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.
येथील महात्मा फुले चौक ते आदीशक्ती माता रोड आणि गाडे मोहल्ल्यातून मेंढा, वडेगावकडे जाणाºया रस्त्याच्या कडेला कचºयाचे व शेणखताचे मोठे ढिगारे असल्याने या भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी या मार्गाने ये-जा करणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
करपडा मार्गावर अंकूर आश्रमशाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर परिसरातील कुटुंबीय आपल्या घरातील केरकचरा व गुरांचे शेण शाळेसमोर नेऊन टाकतात. त्यामुळे सदर निवासी शाळेत राहणाºया विद्यार्थ्यांचे आरोग्य धोेक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या संदर्भात शाळा व्यवस्थापनाने ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर तोंडी सूचनाही दिली. मात्र याचा काही उपयोग झाला नाही. ग्रामपंचायतीने यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. ग्रामपंचायत चौकापासून पुढे मेंढा, वडेगाव या गावाला जाणाºया बायपास मार्गावर पीतांबर लांजेवार यांच्या मालकीच्या बोळीलगत काही लोकांनी शेणाचे ढीग अगदी रस्त्यावर टाकले आहेत. सदर रस्त्याने पायदळ चालणे देखल अडचणीचे झाले आहे. हा रस्ता गोरजाई मंदिराकडे जाणारा आहे. जानेवारी महिन्यात येथील गोरजाई मंदिरात यात्रा भरते. या यात्रेला पूर्वविदर्भातील माना समाज बांधव हजारोंच्या संख्येने दाखल होतात. सदर माना समाजाच्या भाविकांसाठी सोयीचे व्हावे, याकरिता सदर मार्गावरील शेणखत व कचºयाचे ढीग नष्ट करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वैरागड येथील ग्रामपंचायतीच्या आमसभेमध्ये रस्ते, नाली व स्वच्छतेच्या प्रश्नावर चर्चा केली जाते. वारंवार पाठपुरावाही केला जातो, मात्र गावातील विविध समस्या मार्गी लावण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असते, असा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे.
ग्रामपंचायत चौकातून कढोलीकडे जाणाऱ्या बायपास मार्गाची स्वच्छता करण्यात आली असून आता वडेगाव-मेंढा बायपास मार्गाच्या स्वच्छतेचे काम ग्रामपंचायतीमार्फत हाती घेण्यात येईल. रस्त्यावरील शेणखत व कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट लावून रस्ते मोकळे केले जातील. तसे ग्रामपंचायतीचे नियोजन आहे.
- एन.जी.घुटके, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रा.पं. वैरागड