दारू विक्रेत्याचा तंमुस अध्यक्ष व पोलीस पाटलावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:34 AM2017-11-22T00:34:27+5:302017-11-22T00:34:37+5:30
येथील अवैध दारू विक्रेत्यांच्या हातभट्टीवर आरमोरी पोलीस, तंमुस अध्यक्ष व पोलीस पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी धाड टाकून १० हजार रूपयांची दारू व मोहफुलाचा सडवा जप्त केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : येथील अवैध दारू विक्रेत्यांच्या हातभट्टीवर आरमोरी पोलीस, तंमुस अध्यक्ष व पोलीस पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी धाड टाकून १० हजार रूपयांची दारू व मोहफुलाचा सडवा जप्त केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी एका दारू विक्रेत्याने तंमुस अध्यक्ष व पोलीस पाटलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली.
घटनेच्या दिवशी पोलीस पाटील गोरनाथ भानारकर हे आपल्या किराणा दुकानात बसून होते. आरोपीपैकी विलास गोविंदा धनकर याने मद्यंधूद अवस्थेत भानारकर यांना शिविगाळ करण्यास सुरूवात केली. रस्त्यावरची विट फेकून मारली. सदर विट भानारकर यांच्या छातीला लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. तेवढ्यात वैरागड येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष खुशाल सावरकर घटनास्थळी पोहोचले. विलास धनकर याने सावकर यांनाही विट फेकून मारली. त्यामुळे सावकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांनाही आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. घटनेची माहिती पोलीस पाटील भानारकर यांनी आरमोरी पोलिसांना दिले. आरोपीला आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे. वैरागडचे बिट जमादार हे दारू विक्रेत्यांना प्रोत्साहन देत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.