वारांगणा वस्ती हटवली
By admin | Published: August 2, 2015 01:30 AM2015-08-02T01:30:10+5:302015-08-02T01:30:10+5:30
आरमोरी मार्गावरील कठाणी नदीलगत असलेल्या वारांगणा वस्तीतील तब्बल ११ झोपड्या शनिवारी नगर परिषद गडचिरोलीच्या प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ..
पालिकेची कारवाई : महिलांच्या तक्रारीची दखल
गडचिरोली : आरमोरी मार्गावरील कठाणी नदीलगत असलेल्या वारांगणा वस्तीतील तब्बल ११ झोपड्या शनिवारी नगर परिषद गडचिरोलीच्या प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काढून टाकल्या. त्यानंतर येथील वारांगणांना जिल्हाबाहेर जाण्याबाबत पालिका प्रशासनाने बजाविले आहे.
शहरापासून चार ते पाच किमी अंतरावर कठाणी नदीच्या तिरावर ३५ ते ४० वारांगणांनी झोपड्या उभारून आपली वस्ती उभी केली होती. या वस्तीमुळे गडचिरोली शहराच्या सामाजिक जीवनाला धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी काही सामाजिक संघटनांनी नगराध्यक्ष निर्मला मडके यांच्याकडे केल्या होत्या. तसेच गोगाव ग्रामपंचायतीनेही सदर वस्ती हटवावी. याबाबतची ठराव पारित केला होता. त्यानंतर शनिवारी नगर परिषदेच्या प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्तासह जाऊन जेसीबीच्या सहाय्याने वारांगणा वस्तीतील झोपड्या हटविण्याचे काम युध्दपातळीवर पार पाडले व येथील वारांगणांना गडचिरोली जिल्हा सोडून जाण्याबाबतचे आदेश दिले आहे. बांधकाम विभागाचे अभियंता सुरज पुनवटकर यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली.
सदर वारांगणांना ३१ जुलैपर्यंत झोपड्या खाली करण्याबाबत पालिका प्रशासनाने सूचना दिली होती. मात्र त्यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने शनिवारी पालिका प्रशासनाने त्यांवर कारवाईचा बडगा उगारला. (स्थानिक प्रतिनिधी)