वसंतपूर चार दिवसांपासून अंधारात
By Admin | Published: May 9, 2016 01:35 AM2016-05-09T01:35:14+5:302016-05-09T01:35:14+5:30
तालुक्यातील वसंतपूर येथे मंगळवारच्या मध्यरात्री वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला.
वादळामुळे वीज खांब तुटले : महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ त्रस्त
चामोर्शी : तालुक्यातील वसंतपूर येथे मंगळवारच्या मध्यरात्री वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. परंतु वादळाच्या प्रचंड वेगाने येथील सिमेंटचे वीज खांब तुटून पडले. वीज ताराही अस्ताव्यस्त झाल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. परंतु मंगळवारनंतर चार दिवसांचा कालावधी उलटूनही अद्यापही गावातील वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. याबाबीकडे वीज वितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांना चार दिवसांपासून अंधारात राहावे लागत आहे.
चामोर्शी तालुक्यातील वसंतपूर येथे मंगळवारी आलेल्या जोरदार वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांचे छतही उडून गेले. शिवाय झोपड्या व इतर ठिकाणचे गवतही अस्ताव्यस्त झाले. परिसरातील अनेक झाडे तुटून पडली. परिणामी अनेक वीज तारांवर फांद्याही पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. दुसऱ्या दिवशी सदर वीज पुरवठा पूर्ववत करण्याकरिता नवीन वीज खांब लावून तारांची जुळवाजुळव करणे गरजेचे होते. परंतु या सर्व बाबीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी दमट व उष्ण वातावरणात नागरिकांना अंधारातच राहावे लागत आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये वीज वितरण कंपनीच्या कारभाराविषयी तीव्र रोष व्यक्त होत आहे. गावातील वीज पुरवठा खंडित होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला. सर्वत्र अस्ताव्यस्त वस्तू पडलेल्या आहेत. मात्र वीज गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)
आष्टी कार्यालयाकडून उपाययोजना नाही
वसंतपूर येथे मंगळवारी आलेल्या वादळामुळे वीज खांब तुटून वीज पुरवठा खंडित झाला, याची माहिती गावातील सरपंचांनी भ्रमणध्वनीवर आष्टी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला दिली. परंतु येथून कोणताही कर्मचारी गावात वीज दुरूस्तीसाठी आला नाही. गावात पिठ गिरणी, मोटारपंप, संगणकावर विविध कामे केली जातात. परंतु वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गावात सिमेंटच्या वीज खांबऐवजी लोखंडी वीज खांब बसवावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गावातील अनेक आंबेही गळून पडले. त्यामुळे नुकसान झाले. वीज पुरवठा पूर्ववत न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.