भाजीबाजार सुसाट, नागरिक होताहेत बिनधास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:26 AM2021-06-18T04:26:15+5:302021-06-18T04:26:15+5:30
चामोर्शीत गर्दीचा उच्चांक येथील भाजी बाजारात पाय ठेवायलाही जागा नसते एवढी गर्दी होत आहे. दुपारपर्यंत माल खराब होतो. दुकानांच्या ...
चामोर्शीत गर्दीचा उच्चांक
येथील भाजी बाजारात पाय ठेवायलाही जागा नसते एवढी गर्दी होत आहे. दुपारपर्यंत माल खराब होतो. दुकानांच्या आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य असते; पण त्या अस्वच्छतेतही भाजीबाजारात लोक गर्दी करत आहेत. नगर पंचायतने या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच भाजीबाजारात स्वच्छता राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
---
एटापल्लीत खरेदीसाठी झुंबड
आठवडी बाजाराला परवानगी नसल्याने मंगळवारी नियोजित जागेवर बाजार भरत नाही; पण इतरत्र दुकाने लागत आहेत. एटापल्ली-गट्टा मार्गावर लॉकडाऊनच्या काळातही बाजार भरायचा; पण त्यावेळी गर्दी कमी असायची. आता मात्र तेंदूपत्त्याचा पैसा हाती असल्याने बाजारात गर्दी असते. यात कोरोनाच्या नियमांचे पालन होतच नाही.
----
आरमोरीत बऱ्यापैकी नियंत्रण
येथे शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार सध्या बंद आहे. मात्र, दैनंदिन गुजरी भरते. नगर परिषदेसमोरच हा बाजार भरतो. त्यामुळे गर्दी आणि कोरोनाचे नियम पाळण्यावर बऱ्यापैकी नियंत्रण आहे. त्यात विशिष्ट अंतर ठेवून दुकाने लावण्याच्या बाबतीत मात्र नियमांचे पुरेपूर पालन होत नसल्याचे दिसून येते.
----
देसाईगंजमध्ये चार ठिकाणी विक्री
बाजारात एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नगर परिषदेने चार ठिकाणी भाजीबाजार भरविण्यासाठी जागा दिली. टी-पॉइंट, भगतसिंग वाॅर्ड, कुथे कॉन्व्हेंटसमोरील आणि आयटीआयसमोरील जागेत भाजीबाजार भरत आहे. परिणामी, फारसी गर्दी होताना दिसत नाही. तरीही मास्कच्या बाबतीत अधूनमधून तपासणी करणे गरजेचे आहे.
कोट-
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आठवडी बाजाराला परवानगी देण्यात आलेली नाही; पण नियमांचे पालन करून वेगवेगळ्या ठिकाणी भाजी विक्री झाली तर त्यात वावगे काही नाही. हे करताना खरेदीसाठी गर्दी बिलकूल होऊ नये. मास्कचा वापरही अत्यावश्यक आहे. याचे पालन होत नसेल तर स्थानिक प्रशासनाकडून कारवाई होईल.
- कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी