वैलोचना नदी पुलावरील लाकडामुळे वाहतुकीचा खोळंबा
By admin | Published: September 19, 2015 02:01 AM2015-09-19T02:01:06+5:302015-09-19T02:01:06+5:30
प्रचंड मेघगर्जनेसह बुधवारच्या रात्रीपासून गुरूवारी सायंकाळपर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवरील कमी उंचीच्या पुलावर पाणी चढले.
बसफेऱ्या रद्द : पुरामुळे वैरागड-मानापूर मार्ग दोन दिवस होता बंद
वैरागड : प्रचंड मेघगर्जनेसह बुधवारच्या रात्रीपासून गुरूवारी सायंकाळपर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे वैरागडजवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवरील कमी उंचीच्या पुलावर पाणी चढले. त्यामुळे वैरागड-मानापूर या मार्गावरील वाहतूक बुधवारच्या रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत बंद होती. दुपारच्या सुमारास पूर ओसरल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली असती, मात्र या पुलावर मधोमध मोठे लाकूड असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
वैलोचना नदीला आलेल्या पुराने वाहून आलेले मोठे झाड पुलावर आडवे पडले. त्यामुळे वैरागड-मानापूर मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या सकाळच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराच्या सकाळच्या बसेस वैरागडपर्यंत पोहोचल्या. मात्र पुलावर मोठे झाड असल्याने सदर बसेस येथूनच परत गेल्या. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली. बुधवारी रात्रीपासून संततधार पाऊस झाल्याने वैरागड-मानापूर मार्गावरील पुलावरून तीन फूट पाणी वाहत होते. दरम्यान पुराने वाहून आलेल्या लाकडामुळे वाहतुकीचा बराचवेळा खोळंबा झाला.
हलक्याशा पावसानेही वैलोचना नदीला पूर येत असतो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वारंवार प्रभावीत होते. त्यामुळे वैलोचना नदीवर नव्याने मोठ्या उंचीचा पूल बांधावा, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. मात्र याकडे प्रशासनाचा कायम कानाडोळा होत आहे. परिणामी या अडचणींचा सामना नागरिकांना करावाच लागत आहे. (वार्ताहर)